श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने दमदार कामगिरी करत स्पष्ट बहुमत मिळवले. नगराध्यक्षपदी काँग्रेसचे करण ससाणे विजयी झाले आहेत. ससाणे यांनी भाजपचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी यांचा तब्बल ६ हजार ७६७ मतांनी पराभव केला. शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश चित्ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. निकाल जाहीर होताच शहरात काँग्रेस समर्थकांचा उत्साह उसळला. मुख्य प्रशासकीय इमारतीपासून करण ससाणे यांच्या निवासस्थानापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
advertisement
या निवडणुकीत काँग्रेसने करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली ३४ पैकी तब्बल २० जागा जिंकत एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. भाजपला केवळ १० जागांवर समाधान मानावे लागले. तर, शिवसेना शिंदे गटाला अवघ्या ३ जागांवर विजय मिळवता आला. एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मात्र एकही जागा जिंकता न आल्याने पक्षाला नामुष्कीचा पराभव स्वीकारावा लागला.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूरमध्ये तळ ठोकत जवळपास २८ सभा घेतल्या होत्या. त्याशिवाय, प्रचाराची धुरादेखील आपल्या खांद्यावर घेतली होती. मात्र, तरीही भाजपला १० जागांवर समाधान मानावे लागले. मात्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला १७ हजार मते मिळाली.
