कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या भूमिकेवरून ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अधिक जवळ जात आहेत का? असा सवाल उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांनी थोरवे यांच्यावर थेट आरोप करत "ते एकनाथ शिंदेंना कधीही फसवू शकतात" असं वक्तव्य करून राजकीय खळबळ उडवून दिली आहे.
advertisement
रायगड जिल्ह्यातील कर्जत-खालापूर परिसरात शिंदे गटाचे आमदार थोरवे आणि राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतोय. नुकत्याच एका सार्वजनिक कार्यक्रमात आमदार थोरवे यांनी "आपल्याला सर्वांसोबत काम करायचे असल्याचा सूर लावला होता. दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत लोटांगण घालत आपल्याला एकत्र काम करायचं असल्याचे त्यांनी म्हटले. गरज पडली, तर मी तुमच्या पायावर डोक ठेवायला देखील तयार आहे" असं वक्तव्य केल्याचे व्हिडिओ क्लिप्स आणि माहिती आपल्याकडे असल्याचा दावा घारे यांनी केला आहे.
घारे यांनी म्हटले की, जेव्हा महायुती सरकार स्थापन झालं तेव्हा आमदार थोरवे यांनी अनेकवेळा सुनील तटकरे आणि अजित पवार यांचा एकेरी शब्दात उल्लेख केला आहे. आता ते चक्क देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचे म्हणत आहेत. उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रमाणे राष्ट्रवादीला सत्ता असताना पालकमंत्री पद दिले तेच काम देवेंद्र फडणवीस करत आहेत अशी टीका करत मी याबाबत नाराज आहे अशी खदखद थोरवे यांनी व्यक्त केली. त्यामुळे थोरवे यांच्या आगामी राजकीय वाटचालीवर घार यांनी मोठा दावा केला आहे.
घारेंच्या या वक्तव्यामुळे कर्जत-खालापूरमधील राजकारणात पुन्हा एकदा घमासान पेटण्याची चिन्हं आहेत. पालकमंत्री पदावरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात जोरदार आरोप-प्रत्यारोपांचा भडिमार सुरू आहे.