पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान राज्यात जोराचा पाऊस पडण्याची शक्यता नाही. या काळात राज्यातील अनेक भागात हवामान कोरडं राहिल आणि सूर्यदर्शन देखील होईल. 1 ऑक्टोबर रोजी नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये थोडा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाने उघडीप दिल्याने, ज्या ठिकाणी सोयाबिन पिकांचं नुकसान झालेलं नाही तिथे सोयाबिन काढण्याची लगबग दिसू शकते. पावसाने उघडीप दिलेल्या काळात शेतकऱ्यांनी सोयाबिन काढण्याची घाई केल्यास त्यांच्या हाती पिक लागू शकते.
advertisement
4 ऑक्टोबरनंतर मात्र राज्यात पुन्हा जोराचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 3 ऑक्टोबरपासून विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाऊस, नांदेड, लातूर आणि सोलापूरकडे सरकेल आणि हळूहळू सर्व महाराष्ट्र व्यापेल. डख यांच्या अंदाजानुसार, 4 ते 7 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, कोकण, खान्देश, मराठवाडा, विदर्भ, पुणे आणि मुंबईत अनेक ठिकाणी पाऊस पडेल. 8 ऑक्टोबरनंतर मात्र, पाऊस विश्रांती घेईल.
यावर्षी राज्यात पावसाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. विशेषत: मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांसह सोलापूर आणि धारशिवमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी गावं पाण्याखाली गेली असून लाखो हेक्टर शेती क्षेत्राचं नुकसान झालं आहे.