गेल्या आठवड्यातच विदर्भाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते, त्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा मिळाल्याने नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
'रागासा' चक्रीवादळामुळे पावसाचा जोर वाढणार
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेली कमी दाबाची प्रणाली अधिक तीव्र झाली असून, ती 'रागासा' चक्रीवादळाच्या रूपात विदर्भाकडे सरकत आहे. या चक्रीवादळाचा वेग अधिक असल्याने विदर्भातील हवामानात मोठे बदल होणार आहेत.२५ सप्टेंबरपासून विदर्भात पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल. मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आजपासून पुढील ३ ते ४ दिवस संपूर्ण विदर्भामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस धुमाकूळ घालण्याची दाट शक्यता आहे.
advertisement
प्रादेशिक हवामान विभागाने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. नागपूर आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारी पावसाचा जोर सर्वाधिक वाढण्याची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याचा अर्थ या दिवशी धो-धो पाऊस होण्याची शक्यता आहे. या अलर्टमुळे सखल भागांत पाणी साचणे, नदी-नाल्यांना पूर येणे आणि शेतीत पाणी साचून पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.
परतीचा पाऊस लांबणीवर, मान्सून अजूनही ॲक्टिव्ह
सध्या नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून परतीच्या वाटेवर असल्याचे मानले जात असले तरी, नागपूर हवामान केंद्राने स्पष्ट केले आहे की, हा परतीचा पाऊस नाही. मान्सूनचा अधिकृत निरोप अजून झालेला नाही, उलट तो विदर्भात आणि मध्यभारतात ॲक्टिव्ह मोडवर कायम आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विदर्भात परतीच्या पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज नागपूर हवामान केंद्राकडून सांगण्यात आला आहे. मात्र त्यापूर्वी हे 'रागासा' चक्रीवादळ विदर्भाला शेवटचा मोठा दणका देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर, शेतीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी आणि घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. प्रशासनानेही संभाव्य पूर आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी तयारी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.