राज्यातील अतिवृष्टी संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण आणि राज्यातील डिफेन्स कॉरिडॉरसह विविध विषयांवर बोलणं झालं आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. त्यांना मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सहीने निवेदन दिलं आहे. महाराष्ट्रातील पूर परिस्थितीची त्यांनी माहिती दिली. आम्हाला एनडीआरएफच्या मदतीने भरीव मदत द्यावी अशी विनंती केली. पंतप्रधान मोदी यांनीही सकारात्मकता दाखवली आहे. महाराष्ट्र सरकारकडून जसा प्रस्ताव पाठवला जाईल, तशी केंद्र सरकारकडून कारवाई केली जाणार आहे. जेवढी जास्ती जास्त मदत देण्याचं आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिलं आहे' असं फडणवीस यांनी सांगितलं.
advertisement
'दुसऱ्यांना शहाणपण शिकवू नये' मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला
अतिवृष्टीमुळे शेतातचं झालेल्या नुकसानीचा पूर्ण आढावा घेत आहोत. पूर्ण आढावा घेतल्यावर याचा आकडा समोर देऊ. पुढील 2 दिवस पुन्हा पावसाचा इशारा आहे, त्यादृष्टीने सरकार अलर्ट मोडवर आहे. कर्जमाफीबाबत आम्ही यापूर्वी सांगितलं आहे. आमच्या जाहिरनाम्यात आम्ही जे सांगितलं, आम्ही ते दिलंय, त्याची पूर्तता आम्ही करू. कधी करायची त्याचा अभ्यास सुरू आहे. कर्जमाफी एकदाच करता येते. पीएम केअर फंड सारखा फंड तयार करण्याची परवानगी उद्धव ठाकरे यांना दिली होती. पण त्यांना एक पैसा तयार करता आला नाही. 600 कोटी रुपये आपल्या फंडात असताना कोविडमध्ये किती पैसे खर्च केले. त्यामुळं त्यांनी दुसऱ्यांना शहाणपण शिकवू नये, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
8-9 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
गडचिरोली कॉर्पोरेशन बाबत देखील माहिती दिली. चायना पेक्षा कमी किंमतीत आपण स्टील तयार करू शकतो अस त्यांना सांगितलं. ग्रीन स्टीलबाबत देखील त्यात माहिती दिली, त्यांनी सकारात्मकता दाखवली. गडचिरोलीला स्टील हब बनवली आहे. पंतप्रधान पुढच्या महिन्यात 8-9 तारखेला महाराष्ट्रात येणार आहेत. पूरपरिस्थिती बाबत सध्या दौरा नाही. फिंटेकमधील लोक तिथे येणार आहेत. ब्रिटन आणि भारताचे पंतप्रधान त्यात असतील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
नवी मुंबई विमातळाला दी.बा.पाटील यांच नाव
महाराष्ट्रसाठी हा महत्त्वाचा फेस्टिवल आहे. नवी मुंबई विमानतळ, मेट्रो उद्घाटन होईल. नवी मुंबई विमानतळाला दी.बा.पाटील यांचं नाव द्यावं असा प्रस्ताव दिला आहे. नवी मुंबई विमानतळाला आम्ही दी.बा.पाटील यांचं नाव देणार आहोत यात शंका नाही, असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं.
तसंच, 'महाराष्ट्र सरकारच्या वतीने एक डिफेन्स कॉरिडॉरबद्दल माहिती दिली. त्यातून महाराष्ट्रात पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या भागात पहिल्या टप्प्यात कॉरिडॉर उभारलं जाणार आहे. त्यानंतर धुळे, नाशिक भागात दुसऱ्या टप्प्यात उभारलं जाईल. तिसरा नागपूर, अमरावती भागात केला जाईल, याबद्दल रोडमॅप दिला आहे. पंतप्रधान यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.