महायुतीमधूनच चाकणकरांविरोधात मोर्चेबांधणी?
विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वात राज्यातील वाढल्या महिला अत्याचार आणि त्यांच्या निवारणा संदर्भात महत्वाची बैठक विधानभवनात बोलावण्यात आली आहे. मुख्य म्हणजे या बैठकीचे निमंत्रण हे महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना ही पाठविण्यात आले आहे. खरंतर ही बैठकच मुळात महिला आयोगाच्या नेतृत्वात होणे अपेक्षित असताना उपसभापती यांच्या अध्यक्षतेत बोलविली जात असल्याने चर्चांना उधाण आले आहे.
advertisement
वैष्णवी हगवणे प्रकरणात महिला आयोगावर मोठ्या प्रमाणात आरोप झाले आहे. या बैठकीसाठी महिला अत्याचाराबाबत काम करणाऱ्या सामाजिक संघटना, पत्रकार यांना या बैठकीसाठी बोलवण्यात आले आहे.
चाकणकरांविरोधात विरोधकही सरसावले...
रुपाली चाकणकरांविरोधात विरोधी बाकांवरील महाविकास आघाडी सरसावली आहे. आज महाविकास आघाडीतील पक्षातील महिला नेत्या राज्यपालांची भेट घेणार आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत आज महाविकास आघाडीचे महिला शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात महिला आयोगाने योग्य ती दखल घेतली नाही. खरंतर आयोगाने दुर्लक्ष केले असल्याचे आरोप विरोधकांनी केला. महिला आयोगाकडे महिलांच्या तक्रारींकडे योग्य ते लक्ष दिले जात नाही. त्यांचे निवारण केले जाते. आयोगाकडे इतर सदस्य नाहीत अशा महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी भूमिका मविआच्या महिला नेत्यांकडून मांडण्यात आली आहे.
ही मागणी करण्यासाठी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे.