दिल्ली : विधासनभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या राज्यातील नेत्यांची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मध्यरात्री बैठक झाली. या बैठकीत जागा वाटपाचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही बैठक संपली. आज भाजपची पहिली यादी येणार असल्याचंही म्हटलं जात आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपाच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक झाली. जवळपास साडेतीन तास जागावाटप आणि जाहीरनामाच्या मुद्द्यावर बैठक झाली. या बैठकीमध्ये एकत्रितपणे प्रचार करण्याच्या संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय.
advertisement
महायुतीच्या बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आलीय. अमित शाह यांच्यासमोर जागावाटपाचा तिढा सुटला आहे .जवळपास सर्वच जागांचा तिढा सुटला असल्याचं सांगण्यात येत असलं तरी थोड्या जागांचा निर्णय आजच्या बैठकीत झाला नसल्याची माहिती समजते. मात्र त्या जागांचा निर्णय राज्यातील नेत्यांनी एकत्र बसून तिथेच सोडवण्याच्या सूचना अमित शहांनी दिल्या आहेत. निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागण्याचे शाह यांचे निर्देश आहेत. या बैठकीत प्रचाराचे मुद्दे, जाहीरनामा आणि प्रचार सभा यावरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
राज्यात आचारसंहिता लागू झाली असून इच्छुक उमेदवारांकडून हालचालींना वेग आला आहे. विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार की महाविकास आघाडी बाजी मारणार हे ठरेल.