मनीष जालिंदर राऊत (२८, रा. कळंबा रिंगरोड, राऊत कॉलनी) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तर सिद्धू शंकर बनवी (२०, सध्या रा. वाशी नाका, कळंबा रिंगरोड, मूळ रा. शिकनंदी, ता. गोकाक, जि. बेळगाव) असं मृत तरुणाचं नाव आहे. दोघंही एकमेकांचे जिगरी मित्र होते. दोघे एकाच ठिकाणी काम करत होते. पण केवळ आईवर शिवीगाळ केल्याच्या कारणातून ही हत्या केल्याचं समोर आलं आहे.
advertisement
दारू पार्टीनंतर झाला वाद
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सुट्टी असल्याने रात्री अकराच्या सुमारास सिद्धू आणि मनीष हे दोघे दारू पिण्यासाठी एकत्र बसले. रात्री २ वाजेपर्यंत मद्यप्राशन केल्यानंतर दोघंही जेवण करण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले. जेवणादरम्यान दोघांमध्ये वाद झाला आणि याच वादातून सिद्धूने मनीषला आईवरून शिवीगाळ केली. जेवण आटोपून दोघे दुचाकीवरून घरी जात असताना लघुशंकेसाठी थांबले. यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद उफाळून आला. याच रागाच्या भरात रस्त्याच्या कडेला खांबाला टेकून बसलेल्या सिद्धूचा मनीषने तेथेच पडलेल्या वायरने गळा आवळला आणि त्याचा खून करून मृतदेह खांबाला बांधून ठेवला.
सकाळच्या वेळी मृतदेह आढळला
सोमवारी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हॉकी स्टेडियम परिसरातील एका लाईटच्या खांबाला एका तरुणास बांधलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर नागरिकांनी तत्काळ याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, खांबाला वायरने बांधलेला तो तरुण मृत झाल्याचे दिसून आले. त्याच्या तोंडातून रक्त येत होते, ज्यामुळे हा खून असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणसह चारही पोलीस ठाण्यांच्या गुन्हे शोध पथकांना पाचारण करण्यात आले. सुरुवातीला मृत तरुणाची ओळख पटवणे पोलिसांसाठी मोठं आव्हान होतं. पण पोलिसांनी खबऱ्यांचं नेटवर्क वापरून तरुणाची ओळख पटवली आणि अवघ्या ६ तासात आरोपीला अटक केली.
