नेमकं काय घडलं होतं?
ही घटना १४ जुलै २०२४ च्या रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा येथे घडली होती. सुफियान शेख हा त्याच्या काही मित्रांसोबत लुडो खेळत होता. खेळ सुरू असतानाच सुफियानचा आरोपी शमसुद्दीन सय्यद आणि त्याच्या अन्य दोन साथीदारांसोबत किरकोळ कारणावरून तीव्र वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापलेल्या आरोपींनी सुफियानवर चाकूने सपासप वार केले आणि त्याला जागीच ठार केले.
advertisement
पोलिसांची वर्षभरानंतर मोठी कारवाई
याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर पोलिसांनी इतर दोन आरोपींना लगेचच अटक केली होती, पण मुख्य आरोपी शमसुद्दीन सय्यद हा पोलिसांना सतत चकवा देत होता. त्याने महाराष्ट्र सोडून परराज्यात आश्रय घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरूच ठेवला आणि तांत्रिक माहितीच्या आधारावर शमसुद्दीनचा माग काढला. अखेरीस, पोलिसांच्या एका विशेष पथकाने आंध्रप्रदेशातून त्याला मोठ्या शिताफीने अटक केली. वर्षभरापूर्वीच्या या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अटक केल्यामुळे मुंब्रा पोलिसांचं कौतुक केलं जात आहे. आता या आरोपीची पोलीस कसून चौकशी करत असून या प्रकरणातील आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
