घटनेतील मृतकाचे नाव विशाल जगन रंदई (37) असून, आरोपी पतीचे नाव निलेश अरुण ढोणे (35) आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत विशाल रंदई याचे आणि आरोपी निलेश ढोणे याच्या पत्नीचे अंदाजे दोन वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याची चर्चा गावात होती. याबद्दल निलेशलाही काही दिवसांपासून संशय होता, तसेच पत्नीच्या वागणुकीत झालेले बदल पाहून त्याचा संशय अधिक बळावला.
advertisement
याच संशयावरून निलेश आणि त्याच्या पत्नीमध्ये अनेकदा वाद होत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी निलेशला या अनैतिक संबंधांबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. यानंतर आरोपी निलेश ढोणे याने थेट विशाल रंदईला गावातीलच एका एकांतस्थळी बोलावले.
ठरल्याप्रमाणे दोघे भेटले आणि त्यांच्यामध्ये या विषयावरून जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात आरोपी निलेश ढोणे याने तिथे असलेल्या लाकडी दांड्याने विशाल रंदईवर सपासप वार केले. अचानक झालेल्या या प्राणघातक हल्ल्यात विशाल रंदई गंभीर जखमी झाला. वर्मी घाव लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे पांढुर्णा (खु) गावात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने तपास करत आरोपी पती निलेश ढोणे याला अटक केली आहे. घटनेचा अधिक तपास घाटंजी पोलीस करत आहेत.
