आज डोंबिवली पश्चिमेतील गोपीनाथ चौकात महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण उपस्थित होते. याच वेळी मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी भाजपात प्रवेश केला. यानंतर आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. याचं कारण म्हणजे, रवींद्र चव्हाण यांचं एक वक्तव्य. “मोठा मित्रही लवकरच भाजपात येणार” असं वक्तव्य चव्हाण यांनी केलं. त्यामुळे हा मोठा मित्र नक्की कोण? असा सावल उपस्थित केला जात आहे.
advertisement
डोंबिवली पश्चिमेतील गोपीनाथ चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्यात भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित नागरिकांना महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. या मेळाव्यादरम्यान मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला.
मनोज घरत यांनी यापूर्वी भाजपचे उमेदवार महेश पाटील यांच्या विरोधात मनसेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, नंतर त्यांनी तो अर्ज मागे घेतला. यामुळे महेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली. आज झालेल्या पक्षप्रवेशामुळे महायुतीची ताकद अधिकच मजबूत झाल्याचे चित्र दिसत आहे.
यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, “मनोज घरत हे माझे जुने मित्र आहेत. त्यांना आमच्या विचारधारेशी जोडण्याचा प्रयत्न मी अनेकदा केला होता. अखेर आज ती वेळ आली आहे. मित्र जास्त काळ वेगवेगळ्या ठिकाणी राहू शकत नाहीत, असे सांगत त्यांनी पुढे सूचक वक्तव्य करत म्हटले की, “मला खात्री आहे की मोठा मित्रही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करेल; फक्त योग्य वेळेची वाट पाहतो आहे.”रवींद्र चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, तो “मोठा मित्र” किंवा “मोठा भाऊ” नेमका कोण, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
मनसे मधील कोणता मोठा नेता आता भाजपात प्रवेश करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मनोज घरत यांनी आपल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, गेल्या वीस वर्षांच्या राजकीय प्रवासानंतर हा निर्णय जड अंतःकरणाने घेतला आहे. केंद्र आणि राज्यात महायुतीचे सरकार असून विकासकामांसाठी निधी मिळावा, तसेच सहकाऱ्यांच्या भावना जपाव्यात, या उद्देशाने आपण भाजपात प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांच्यासोबतच्या आठवणी कायम राहतील, असे सांगत त्यांनी भाजपमध्ये मिळेल त्या जबाबदारीने काम करण्याची भूमिका मांडली.
