छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरातही प्रचंड गर्दी झाली. मुंबई, ठाणे, नाशिक, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अशा विविध भागांतून आलेले आंदोलनकर्ते सीएसएमटीवर उतरल्याने रेल्वे स्टेशन परिसरात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झासे. मध्य रेल्वेच्या गाड्याही काही काळ उशिरा धावू लागल्या. मिळालेल्या माहितीनुसार, गाड्या दहा मिनिटांच्या विलंबाने सुटत आहेत. संध्याकाळी गर्दीच्या वेळी गाड्या उशीराने धावत असल्याने मुंबईकरांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागणार आहे.
advertisement
मध्य रेल्वेच्या लोकल 10 ते 15 मिनिटे उशिरा
मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा कोलमडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील ट्रॅकवर आंदोलक उतरल्याने मध्य रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशी संतप्त झाले आहेत. संध्याकाळी गर्दीची वेळ असल्याने गाडीत चढण्यासाठी झुंबड उडाली आहे. वेळेत घरी पोहोचण्याचा प्रवाशांचा प्रयत्न असतो. मात्र आज प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
सीएसएमटीनंतर आता चर्चगेट स्टेशन काबीज करण्यास सुरुवात
मराठा आंदोलकांनी सीएसएमटीनंतर आता चर्चगेट स्टेशन काबीज करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील जोरदार पावसाने आंदोलकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. अशात, आडोसा घेण्यासाठी मराठा आंदोलक विविध ठिकाणी आसरा घेताना दिसत आहे.
रस्त्यांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
आझाद मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या आंदोलनामुळे सरकारवरचा दबाव आणखी वाढला असून आगामी दिवसांत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कोणता तोडगा निघतो याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
सीएसएमटी स्थानकातील आंदोलकांनी शांत राहावं, मनोज जरांगेंचं आवाहन
सीएसएमटी स्थानकातील आंदोलकांनी शांत राहावं, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय. तसंच दोन-चार जणांमुळे आंदोलन बदनाम होतंय, असं म्हणत जरांगेंनी फटकारलंय. गोंधळ घालणारे कुठले आहेत ते तपासा, असंही आवाहन जरांगेंनी केलंय.