अविनाश कानडजे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे यांनी मंगळवारी शासकीय आदेश आल्यानंतर उपोषण सोडले. राज्य सरकारच्या मराठा आरक्षण उपसमितीने जीआर जारी काढल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनातील काही नेत्यांनी या जीआरवर आक्षेप नोंदवत मराठा समाजाच्या हाती फारसं काही लागलं नसल्याची टीका केली. त्यावर आज मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्यु्त्तर दिले. आरक्षणाच्या नावावर ज्यांना राजकारण करायचे आहे, त्यांचे स्वप्नभंग झाल्याने त्यांच्या पोटात दुखत असल्याची टीका जरांगे यांनी केली. मराठा समाजाच्या हिताचा निर्णय झाला असून ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement
मुंबईतील उपोषण आंदोलन संपवून मनोज जरांगे पाटील हे पहाटेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर मधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. त्यानंतर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जरांगे यांनी म्हटले की, माझ्या गरीब मराठ्यांनी जिवाची बाजी लावून अखेर ही लढाई जिंकली. सरकारने आरक्षणासंबंधी काढलेल्या तिन्ही जीआरचे श्रेय मी समाजाला देतो. हे यश त्यांचेच असल्याचे त्यांनी म्हटले.
मराठा समाजासाठी मंगळवारी काढण्यात आलेले तिन्ही जीआर अतिशय महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. आपण, यावेळी मसुदा नव्हे तर थेट शासननिर्णय घेऊन आलो असल्याचे जरांगे यांनी म्हटले. या तिन्ही निर्णयांमुळे आता ओबीसी प्रवर्गातून कुणबी आरक्षण मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने माझ्या शब्दावर विश्वास ठेवला. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळे मराठवाडा सगळे मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार यात तिळमात्र शंका नसल्याचे त्यांनी म्हटले.
म्हणून त्यांच्या पोटात दुखतंय...
मनोज जरांगे यांनी जीआरवरून टीका करणाऱ्यांवरही निशाणा साधला आहे. आपल्या हातातून सगळे गेल्यामुळे काहींचे पोट दुखत असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांना ज्या आरक्षण व गॅझेटवर राजकारण करायचे होते. ज्याच्यावर त्यांचे संपूर्ण जीवन अवलंबून होते. आता ते पूर्णतः कोलमडून गेले आहे. मग आता करायचे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला असल्याचे जरांगे यांनी म्हटले. जीआर वरुन टीका करणारे हे लोक आतापर्यंत केव्हाच आपल्या बाजूने बोलले नाहीत. हे नवे नाही. मराठा समाजाला याचा जुना अनुभव असल्याचे त्यांनी म्हटले. मराठा समाजाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे आणि आनंद साजरा करावा असे त्यांनी म्हटले.