धाराशिव, 03 नोव्हेंबर : संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी लढा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं नाव आता घराघरात पोहोचलं आहे. 10 दिवसांचं उपोषण केल्यानंतर जरांगे पाटील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहे. पण दुसरीकडे धाराशिव तुळजापुरात जरांगे यांच्या पत्नी सुमित्रा जरांगे यांच्या नेतृत्वात महिला पदयात्रा निघाली होती. जरांगे पाटलांचं उपोषण मागे तर जरांगेच्या पत्नीची एन्ट्री झाल्याने पती पत्नीसोबत मराठा आरक्षणाचा लढा एकत्र लढताना दिसत आहेत. तुळजापुरात आंदोलकाशी संवाद साधत तुळजापुरातील मागण्याचे निवेदन तहसीलदारांना दिले.
advertisement
मराठा आरक्षणाच्या मागणीला घेऊन मनोज जरांगे हे आंदोलनाच्या माध्यमातून सरकारशी दोन हात करत आहे. मनोज जरांगे यांचं हे सरकार बरोबर आरक्षणाचे युद्ध सुरू असताना त्यांची पत्नी देखील या लढ्यात आता त्यांच्या बरोबरीने सहभागी होताना दिसत आहे. आज तुळजापुरात त्यांच्याच नेतृत्वाखाली महिला पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. जरांगे यांचं कुटुंबीय हे तुळजापूरला दर्शनासाठी जात असल्याचे समजतात, त्यांना जागोजागी रस्त्यात अडवण्यात आलं ते आंदोलनाला वेळेवर पोहोचू शकले नाहीत पण त्यांनी देखील तुळजापुरात येत आईच दर्शन घेतलं आणि त्यानंतर आंदोलकाशी संवाद साधला. आंदोलकाच्या मागण्याचे निवेदन तहसीलदारांना दिले. 'मला माझ्या नवऱ्याची चिंता वाटत नसून समाजाचा आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
जरांगे यांची पत्नीच नाही तर मुलगी देखील त्यांच्या बरोबरीने आहे. 'सरकारने वडिलांचा अंत पाहू नये, वडील एकदम हट्टी असून ते आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाहीत, त्यांना डॉक्टरांनी उपोषण करू नका, असं सांगितलं आहे. तरी पण ते उपोषण करतात. त्यांनी उपोषण करू नये पण, शेवटी पर्याय नाही. आरक्षण मिळवायचं असेल तर लढा निकाराने द्यायला हवं, असं जरांगे यांची मुलगी पल्लवी जरांगे हिने ठामपणे सांगितलं.
आज तुळजापुरात महिलांची पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. जरांगे यांचे उपोषण सुरू असताना तुळजापुरातील पुजारी जरांगे यांना तुळजाभवानीचे तीर्थ देऊन त्यांची भेट घेतली होती. तुमचं उपोषण यशस्वी झाल्यानंतर दर्शनाला या, असं साकडं त्यांनी घातलं होतं. मी नाही आलो तर कुटुंबीय येईल, असं आश्वासन जरांगे यांनी दिलं होतं. त्यानुसारच त्यांची पत्नी आणि मुलगी ही तुळजाभवानीच्या दर्शनाला आले.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा भक्कम आधार असल्याचं आजपर्यंत आपण समाजात पाहिला आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत ही मनोज जरांगे यांच्या पाठीमागं त्यांच्या पत्नीचा आणि कुटुंबाचा भक्कम आधार असल्याने त्यांची अर्धी लढाई आतापर्यंत यशस्वीपणे पार पाडली आहे. यापुढेही ती लढाई यशस्वीरित्या पार करतील, असा आशावाद नेहमीच सर्वसामान्यातून व्यक्त केला जातोय.