मनोज जरांगे पाटील यांनी परळी येथे महादेव मुंडे कुटुंबीयांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी मयत महादेव मुंडे यांच्या कुटूंबियांना अश्रू अनावर झाले. आपण या प्रकरणात अंतिम क्षणापर्यंत लढून महादेव मुंडे यांना न्याय मिळवून देऊ, असे जरांगे म्हणाले.
माध्यमांशी संवाद साधतांना जरांगे पाटील म्हणाले, एक बांधव सांगतोय की महादेव मुंडे यांच्या मांसाचा तुकडा एका व्यक्तीने नेवून टेबलवर ठेवला. मुंडे कुटुंबीयांनीही यावरून अनेक आरोप केले आहेत. तरी देखील आरोपी अटक होत नाहीत. या प्रकरणात जे कोण पोलिस अधिकारी, कर्मचारी होते, त्यांचे कॉल डिटेल्स देखील तपासायला हवेत, आता मी या प्रकरणात लक्ष दिले आहे, काय काय होते ते तुम्हाला दिसेल, असे जरांगे पाटील म्हणाले, येत्या 25 तारखेपर्यंत एसआयटी नियुक्त न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
advertisement
महादेव मुंडे खून प्रकरणात बजरंग बाप्पाही अमित शाहांना भेटणार
परळी येथील महादेव मुंडे हत्या प्रकरणात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, खासदार बजरंग सोनवणे थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा न्यायासाठी संघर्ष सुरू आहे. मात्र सरकार चालढकल करीत असल्याचा आरोप करून ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. याच पार्श्वभूमीवर थेट देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी बजरंग सोनवणे करणार आहेत. या भेटीमुळे बीडच्या आकाभोवतीचा फास अधिक घट्ट आवळणार असल्याचा अंदाज आहे.
महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचा सहकारी बाळा बांगर याने मोठे खुलासे केले आहेत. वाल्मिक कराड यानेच महादेव मुंडे प्रकरणातील प्रत्यक्षदर्शिला संपविल्याचा दावा त्याने केला. महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर परळीतील धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून वाल्मिक कराडने पोलिसांना फोन केले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास थांबला. १८ महिने होऊनही तपास लागलेला नाही, असा आरोप ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला होता. गेल्या आठवड्यात बजरंग सोनवणे यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेऊन केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटतो, असा शब्द दिला होता.
