विधानसभा निवडणुकीतून माघारीची घोषणा केल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे आता विविध जिल्ह्यांच्या भेटीवर आहेत. या दरम्यान जरांगे पाटील हे मराठा समाजाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सभांना संबोधित करत आहेत. एका सभेत बोलताना मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकेची झोड उठवली.
फडणवीसांसोबत वैर नाही पण....
मनोज जरांगे यांनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीसांना सोडणार नाही. त्याने समाजाचे खूप वाटोळं केले आहे. फडणवीस हे माझे शत्रू नाही, समाजाचेही शत्रू नाही. त्यांच्यासोबत माझं काही वैयक्तिक वैर असण्याचे कारण नाही. पण, फडणवीस यांनी आई-बहिणींवर हल्ला केला. त्यावेळी महिलांनी केलेला आक्रोश आजही आठवतो. त्यांच्या किंकाळ्या आठवल्या तरी थरकाप उडतो असे जरांगे यांनी म्हटले. उपस्थितांना त्यांनी म्हटले की, महिलांची साधी भांडणे झाले तरी त्यावेळचा आवाज व्यथित करतो. त्यावेळी काय झालं असेल याची कल्पना करून पाहा, असे जरांगे यांनी म्हटले.
advertisement
मनोज जरांगे हे अंतरवाली सराटीत उपोषणावर असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्याशिवाय, जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला होता. या लाठीचार्जमध्ये महिलांसह अनेकजण जखमी झाले होते. या लाठीचार्ज तीव्र पडसाद राज्यात उमटले होते.
निवडणुकीतून माघार...
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलकांचे इतर समाज घटकासोबतचे उमेदवार उभे राहणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली. मात्र, जरांगे यांनी काही मतदारसंघाची घोषणा केली होती. मात्र, एका दिवसानंतर निवडणुकीतून माघार घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. जरांगे यांच्या निर्णयाची उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.
