मुंब्रामध्ये मराठी-अमराठी असा वाद उफाळून आला आहे. मुंब्रामधील घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. फळविक्रेत्याला मराठी का येत नाही विचारले म्हणून जमावाने तरुणाला कान पकडून माफी मागायला लावली. यावेळी बिगर मराठी जमावाने मराठी तरुणाला शिविगाळ केली. मराठी तरुणावरच मुंब्रा पोलिसांनी गु्न्हा दाखल केला आहे.
प्रकरण काय?
मराठी तरुण विशाल गवळी मुंब्रामध्ये फळ खरेदी करण्यास गेला होता. त्यावेळी या विशाल गवळीने फळ विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितले. त्यावरुन वाद झाला. मला मराठी येत नाही मी हिंदीत बोलणार असं फळ विक्रेत्याने सांगितले. त्यानंतर मराठी तरुण “महाराष्ट्रात रहायचे असेल तर मराठी आलेच पाहिजे, मी मुंब्रा बंद करुन टाकेन” असं बोलू लागला. मराठी तरुणाचा आक्रमक पवित्रा पाहिल्यानंतर इतर विक्रेते आणि स्थानिकांनी तरुणाभोवती गर्दी केली.
मराठी येत नाही, काय करायचं ते कर...
मराठीचा आग्रह धरणाऱ्या तरुणाला बिगर मराठी जमावाने घेरले. मुंब्रामध्ये मराठी-हिंदी वाद का करतो, मुंब्रा शांत आहे शांत राहू दे असे स्थानिक बोलू लागले. गर्दी वाढल्याने वाद चिघळला.आम्हाला मराठी येत नाही काय करायचे ते कर असं गर्दीतले लोकं बोलत होते. हिंदी येते तर हिंदीत बोल वाद कशाला करतो असं बोलून मराठी तरुणाला पोलीस स्टेशनला नेले. पोलिसांनी स्थानिकांच्या तक्रारीवर मराठी तरुणावरच गु्न्हा दाखल केला आहे. ही घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.