नाशिकच्या चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबली येथे ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय महिलेने जीवन संपवले आहे. मोहिनी चंद्रकात अहिरे असं मृत विवाहितेचे नाव आहे. माहेरहून मोबाईल, गाडी, पैसे आणण्यासाठी विवाहतेवर कायम दबाव टाकला जात होता. सासरच्या सतत वाढत जाणाऱ्या मागण्या आणि त्या पूर्ण न झाल्यामुळे होणारे वाद, शिवीगाश, मारहाण या सर्व गोष्टी मोहिनीला असह्य झाल्याने तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा नातेवाईकांचा दावा आहे. लग्नानंतर काही वर्षात हे पाऊल उचलल्याने नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
advertisement
सासरच्या दारातच अंत्यसंस्कार
या घटनेची माहिती समजताच माहेरच्या नातेवाईकांनी सासरी धाव घेतली आणि जाब विचारला. मात्र दोन्ही कुटुंबात झालेल्या वादानंतर मुलीच्या माहेरच्या कुटुंबीयांना तिच्या सासरच्या घरासमोरच तिची चिता पेटवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित कुटुंबीयांना दारात मुलीच्या मृतेदावर अंत्यसंस्कार करत संताप व्यक्त केला. या प्रकरणी तिच्या पतीसह 6 जणांवर चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल केला असून यातील सर्व संशयितांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील अधिक तपास करण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पुरोगामी म्हणविणा-या महाराष्ट्रात आजही हुंडाबळी
पुरोगामी म्हणविणा-या महाराष्ट्रात आजही हुंडाबळी जातोय. सासरच्या मंडळींच्या मागण्या पूर्ण न झाल्यास महिलांचा शारिरीक आणि मानसीक छळ केला जातो. तर या छळाला कंटाळून आणि हुंड्याची मागणी पूर्ण करू शकत नाही म्हणून महिला स्वत:चे आयुष्य संपवतात. विवाहित महिलांवर हुंड्यासाठी घराघरांमध्ये होणारे मानसिक व शारीरिक शोषण, हिंसाचार हे भयावह असूनही त्याबाबत समाज इतका उदासीन का? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.
