नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून तिला पैशांची गरज होती. यासाठी तिने भोकरदनमध्ये राहणाऱ्या आपल्या एका मित्राकडे पैसे मागितले होते. संबंधित मित्राने तिला बुधवारी रेल्वे स्टेशन भागातील एका हॉटेलमध्ये बोलावले होते. तिथे त्यांनी १०५ क्रमांकाची रूम बुक केली होती. इथं त्यांनी रात्री जेवण केलं, मद्य प्राशन केलं. यानंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास पीडिता फोनवर बोलण्यासाठी खोलीच्या बाहेर आली.
advertisement
फोनवर बोलून झाल्यानंतर ती परतत असताना, महिलेचा गोंधळ झाला आणि तिने चुकून १०५ ऐवजी २०५ क्रमांकाच्या रूमचा दरवाजा ठोठावला. या एका चुकीमुळे पीडितेचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.
रात्रभर अत्याचार आणि नराधमांचे कृत्य
खोली क्रमांक २०५ मध्ये आधीच तीन तरुण मद्यपान करत बसले होते. महिलेने दरवाजा ठोठावताच त्यांनी तिला जबरदस्तीने आत ओढले आणि दरवाजा लावून घेतला. नराधमांनी पीडितेवर बळजबरी करत तिला बिअर पाजली आणि त्यानंतर तिघांनी आळीपाळीने तिच्यावर रात्रभर सामूहिक अत्याचार केला.
पहाटे ३ ते ४ च्या सुमारास पीडितेने कशीबशी आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि खोलीचा दरवाजा उघडून आरडाओरड केली. त्यानंतर तिने थेट वेदांतनगर पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली.
३ तासांत आरोपी अटकेत
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ हॉटेल गाठलं. आरोपींनी गुन्ह्यानंतर मोबाईल बंद करून पळ काढला होता. मात्र, पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज आणि बुकिंगसाठी दिलेल्या नावांच्या आधारे तपास सुरू केला. अवघ्या ३ तासांत पोलिसांनी जिन्सी, मोंढा आणि भानुदासनगर परिसरातून तिन्ही आरोपींना अटक केली. घनश्याम भाऊलाल राठोड (वय २७), ऋषिकेश तुळशीराम चव्हाण (वय २५) आणि किरण लक्ष्मण राठोड (वय २५) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.
कोण आहेत आरोपी?
अटक केलेले तिन्ही आरोपी अविवाहित आहेत. यातील दोघेजण एका फायनान्स कंपनीत वसुलीचं काम करतात, तर एक जण खाजगी नोकरी करतो. या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त केला जात असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वेदांतनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
