मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाण्याच्या मयुरी बुडुकले या तरुणीचा जळगाव खानदेश येथील गौरव ठोसर या तरुणासोबत गेल्या चार महिन्यापूर्वी म्हणजेच 10 मे 2025 रोजी विवाह पार पडला. त्यावेळी ठरल्याप्रमाणे पाच लाख रुपये हुंडा देण्यात आला. मात्र लग्नाच्या एक महिन्यानंतर मेडिकल टाकण्यासाठी स्वतःचं दुकान घ्यायचं असल्याचं सांगत मयुरीच्या माहेरी दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला. त्यामुळे तिच्या आई वडिलांनी आठ लाख रुपयांची जुळवाजुळव करून मयुरीच्या सासूकडे दिली. उर्वरित दोन लाख रुपये काही दिवसात देण्याचे आश्वासन दिले.
advertisement
मात्र पैशांसाठी तगादा सुरूच होता. घटनेच्या दिवशी दुपारी एक ते दीड वाजताच दरम्यान मुलीसोबत बोलणे झाल्यानंतर माहेरी अचानक कॉल आला आणि तुमच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली. यामध्ये कुटुंबीयांना एकच धक्का बसला. त्यामुळे आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय मयुरीच्या माहेरच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच, सर्व नातेवाईकांनी ताबडतोब जळगाव खान्देश गाठत रुग्णालयात गेले, मात्र त्या ठिकाणी सासरच कोणीही हजर नव्हतं आणि मृतदेह दवाखान्यात बेवारसपणे ठेवल्याचा आरोप आहे. त्यामुळे नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये धडक देत आपल्या मुलीची हत्याच करण्यात आल्याची तक्रार नोंदवली. मात्र पोलिसांनी सहकार्य न करता तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. अंगावर तक्रारीची प्रत फेकून गैरवर्तणूक केल्याचा आरोप मयुरीच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.. मयुरी ही उच्चशिक्षित होती, तिचे बीएससी ऍग्री पर्यंत शिक्षण झाले होते. ती खंबीर असल्याने आत्महत्या करूच शकत नाही, असा ठाम विश्वास मयुरीच्या बहिणीने व्यक्त केला आहे. शिवाय मयुरीच्या अंगावर मारहाणीच्या जखमा आणि व्रण देखील पाहिल्याचं सांगण्यात येत आहे.
मयुरीची आत्महत्या नसून तिचा सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी खून केलाय. आरोपीला पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास जळगाव पोलिसांकडून काढून एसआयटी मार्फत हा तपास करण्यात यावा. अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे.. त्यासाठी ते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेणार असल्याचं सांगण्यात आलंय.