डोंबिवलीत आंबेडकर जनहितवादी संघटना आणि कम्युनिस्ट विचार मंच यांनी सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विरोधात सभा आयोजित केली होती. या सभेला विरोध करण्यासाठी भाजपचे काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी सभेच्या ठिकाणी जमलं होते. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना गेटपाशीच अडवलं. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे बराच वेळ त्या ठिकाणी उभे होते आणि आम्हाला 'आत मध्ये जाऊ द्या' अशी पोलिसांना विनंती करत होते. मात्र पोलिसांनी एकालाही आत सोडलं नाही.
advertisement
दरम्यान, पत्रकारांना ही माहिती मिळताच पत्रकारही तिथे पोहोचले, मात्र पोलिसांनी पत्रकारणात सुद्धा आतमध्ये जाण्यास परवानगी दिली नाही. अर्ध्या पाऊण तासानंतर पोलिसांनी आंबेडकर जनहितवादी संघटना आणि कम्युनिस्ट विचार मंच यांच्या कार्यकर्त्यांना आणि सभेतील जमलेल्या काही लोकांना बाहेर जाण्यास वाट करून दिली आणि सदर ठिकाणी कुठलाही गोंधळ होऊ नये, याची काळजी घेतली. कार्यक्रम संपल्यानंतर घटनास्थळाहून भाजपचे कार्यकर्तेही निघून गेले.
या सभेसाठी 20 ते 25 जण जमा झाले होते अशी प्राथमिक माहिती असून सभा झाली की नाही झाली यावर कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, सदर सभेला पोलिसांची परवानगी होती का हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. याबाबत पोलिसांना की काय प्रकार घडला हे विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिलाय.