राज्यातील ५१८७ जणांना आज अनुकंपावर लिपिक पदावर रुजू करून घेत नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. छत्रपती संभाजी नगरात देखील पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार अनुराधा चव्हाण यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील एकूण 303 उमेदवारांना हे नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले. यावेळी पालकमंत्री शिरसाट यांनी व्यक्तिगत आयुष्यात आलेले अनुभव सांगितले. तसेच आमदार अनुराधा चव्हाण यांच्या पतीचे उदाहरण देत शासकीय नोकरीचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले.
advertisement
वशिल्यावर भावाला नोकरीला लावले, २ महिने पगाराचे पैसे दिले, पण नंतर...
पूर्वी वशिलेबाजी चालायची. वशिला लावून मी माझ्या भावाला शासकीय नोकरी लावली. नोकरीचा पहिला पगार त्याने माझ्या हातात ठेवला, पेढे वाटले. मी त्याला म्हटले, घराचा खर्च आता तू बघायचा. नोकरीला लागला आहेस, जबाबदारी घ्यायला हवी. नंतर त्याचे लग्न लावून दिले. मात्र पुढच्या सहा महिन्यात तो मलाच विसरून गेला. सहा महिन्यांनी त्याने मला ओळखणेही बंद केले, असा व्यक्तिगत सांगत तुमच्या आयुष्यात तुम्ही असे करू नका असा सल्ला शिरसाट यांनी नव्याने शासकीय सेवेत येणाऱ्या व्यक्तींना दिला.
शासकीय नोकरी कशी करायची, आमदार चव्हाण यांच्या पतीचे उदाहरण देऊन मंत्री शिरसाट यांनी पटवून दिले
शासकीय नोकरीची काय किंमत असते याचे उदाहरण देखील पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी आमदार अनुराधा चव्हाण यांच्या पतीचे उदाहरण देत करून दिले. आमदार अनुराधा चव्हाण यांचे पती मराठवाडा विभागाचे मुख्य अभियंता आहेत. एकवेळी आमदार चव्हाण यांच्या फ्लेक्सवर त्यांच्या पतीचाही फोटो लावला गेला. त्यावर, तुझ्या राजकारणात मला कशाला ओढतेस? माझे काम वेगळे आहे. ते काम मला करू दे... असे पत्रातून मिस्टर चव्हाण यांनी खडसावून सांगितले. याला म्हणतात वर्किंग स्टाईल अर्थात कामाची शैली... असे म्हणत चव्हाण यांच्या प्रामाणिक कामाचे कौतुक शिरसाट यांनी केले.