मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत भाजपने बाजी मारली असली, तरी या निवडीने शहरात भाषिक वादाला तोंड फुटले आहे. भाजपच्या डिंपल मेहता ७९ मते मिळवून महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. मात्र, 'मराठी राज्यात अमराठी महापौर' बसवल्याचा आरोप करत मराठी एकीकरण समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मराठी माणूस पेटून उठणार का?
advertisement
डिंपल मेहता यांच्या निवडीची घोषणा होताच मराठी प्रेमी संघटनांनी सुभाषचंद्र बोस मैदानाबाहेर एकत्र येत जोरदार निदर्शने सुरू केली. "मराठी महापौर, आमची गरज आमचा अधिकार" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी आंदोलकांनी थेट महापौरांच्या विरोधात मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतले.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण
मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, "हे मराठी राज्य आहे, येथे मराठी अस्तित्व टिकलेच पाहिजे. १०७ हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेल्या महाराष्ट्रात मुद्दाम मराठी माणसाच्या नाकावर टिच्चून अमराठी महापौर बसवला जात आहे. मुंबई गुजरातमध्ये जाऊ नये म्हणून आमच्या पूर्वजांनी गोळ्या झेलल्या, आता पुन्हा तोच संघर्ष करण्याची वेळ आली आहे."
राजकीय वातावरण तापले
मीरा-भाईंदरमध्ये मोठ्या प्रमाणावर अमराठी मतदार असले, तरी स्थानिक मराठी संघटनांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे भाजपसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. मनसेनेही या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने शहरात तणावपूर्ण शांतता आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका मुख्यालय आणि परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
