राज ठाकरे यांनी शेकापच्या मेळाव्यात भाष्य केल्यानंतर मनसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. शेतकरी कामगार पक्षाच्या 78 व्या वर्धापन दिनाच्या दिवशी शेतकरी कामगार पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत, राज ठाकरे हे एकाच मंचावर पहायला मिळाले. यावेळी राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावर भाषण करताना रायगड जिल्ह्यातील डान्सबार विषयी भाष्य केले होते. राज ठाकरे बोलल्यानंतर अवघ्या 12 तासांतच पनवेल मधील डान्सबार फोडण्यात आला. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी पनवेल मधील नाईट रायडर हा डान्स बार फोडला. मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर एकच खळबळ उडाली.
advertisement
डान्स बारवर राज ठाकरेंची सडकून टीका...
शेकापच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्यावर बोलताना रायगडमध्ये वाढलेल्या परप्रांतीयांच्या टक्क्यावर भाष्य केले होते. त्याच वेळी त्यांनी रायगडमध्ये फोफावलेल्या डान्स बार संस्कृतीवरही जोरदार टीका केली. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला जिल्हा आहे. महाराजांचा राज्यकारभार ज्या किल्ल्यांवरून चालला त्या किल्ल्यावरून या जिल्ह्याला नाव पडले. असे असताना रायगडची ओळख आता डान्सबारचा जिल्हा अशी होऊ लागल्याचे त्यांनी म्हटले.
मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग नाही...
महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग उभे राहू देणार नाही. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मानसन्मान ठेवूनच ते उद्योग इथे आणावे लागतील. त्याशिवाय तुम्हाला ते आणता येणार नाहीत. कोण कुठे येतो आणि काहीही करतो, पत्ताच लागत नाही. रायगड जिल्ह्यात अनेक प्रकल्प येत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत. उद्योगधंद्यांसाठी लागणारं मनुष्यबळ बाहेरच्या राज्यातून येत आहे. त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार नाही, हे विदारक चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत असल्याचे त्यांनी म्हटले.