बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे यांनी म्हटलं की, लातूरमध्ये एक पाटी पाहिली पुण्यात घर हवंय का ? लाज वाटली हे वाचल्यावर, का असं होतंय, कारण काय? आपले तरुण तरुणी कामासाठी बाहेर जातात, त्यांच्यासाठी ही पाटी आहे. त्यांना इथं थांबावं असं का वाटत नाही, इथं काम करावं असं का वाटत नाही असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.
advertisement
केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे यांच्यासाठी नोकरी नाहीय. जिथं नोकरी उपलब्ध नाही तिथं आपण आरक्षणासाठी भांडण करतोय. लहान मुलं देखील म्हणतात ते त्या समाजाचे, एकमेकांना जातीच्या द्वेषाने पहातोय. महाराष्ट्रात याआधी हे कधी घडलं नव्हतं अशी उद्विग्न भावना राज ठाकरेंनी व्यक्त केली.
मराठवाड्यातले तरुण बेरोजगार होऊन पुणे, मुंबईला रोजगारासाठी जातायत. इथला तरुण बाहेर का जातोय याचा विचार केला का? आतापर्यंत त्याच त्या लोकांना का निवडून दिलं, आता बदल करा. महाराष्ट्राला सांगेन एकदा राज ठाकरे यांच्या हातात सत्ता देऊन बघा असंही राज ठाकरे म्हणाले.
मी सत्ता न पाहिलेला माणूस नाही. मी सत्ता पाहिलीय. माझा जाहीरनामा लवकरच येईल. मला जे शक्य आहे तेवढ्याच गोष्टी मी जाहीरनाम्यात टाकत आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या करतायत त्याकडे कुणाचंच लक्ष नाही. राज्यात, मराठवाड्यात महिला पळवून नेण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. महत्त्वाच्या विषयात लक्ष जाऊ नये म्हणून जातीपातीचं राजकारण तुमच्यासोबत आलंय असं राज ठाकरे म्हणाले.
इतकी वर्षे सत्तेत राहून काय विकास केला?
दोन दोन मुख्यमंत्री ज्या लातूरने् राज्याला दिले तिथं रस्तेही चांगले नाहीत. देशाचे गृहमंत्री राहिलेले शिवराज चाकूरकर हे लोकसभेचे सभापतीसुद्धा होते. त्या चाकूर गावात सभेला गेलो तर तिथं अंधार होता. सभासुद्धा जनरेटरवर झाली. इतकी वर्षे सत्तेत राहून काय विकास केला असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.
शरद पवारांना म्हणाले महान संत
शरद पवार यांच्यावरही राज ठाकरे यांनी घणाघाती टीका केली. शरद पवार यांचा उल्लेख महान संत असंही केला. राज ठाकरे म्हणाले की,1999 साली महान संत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जन्म घातला. यानंतर जातीयवादाची पाळेमुळे खोलवर रुजली. मागील 40 वर्षांपासून राजकारणात संधी मिळालेले शरद पवार यांनी बारामती तालुक्यात अनेक उद्योगधंदे आणले. मात्र त्यांनी उर्वरित महाराष्ट्राचा कधी विचार केला नाही. मराठवाड्यात उद्योगधंदे नाहीत, विदर्भात नाहीत.
