छत्रपती संभाजीनगरचे मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. मराठ्यांना संपवायला निघालेला औरंगजेब येथे गाडला, असा बोर्ड औरंगजेबाच्या कबरीच्या जवळ लावा तसेच कबरीवर शाळेच्या सहली काढण्याचे आदेश द्या, असे पत्रात म्हटले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्क मुंबई येथे पार पडला. यावेळी दिलेल्या भाषणात राज ठाकरे यांनी सध्याच्या परिस्थितीवर, इतिहासावर आणि गलिच्छ जातीय राजकारणावर प्रकाश टाकला, चुकीच्या गोष्टीवर सडेतोडपणे टीका केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे आमच्या संभाजी महाराजांना अमानुषपणे, क्रूरपणे मारणाऱ्या औरंगजेबाची कबर आहे. छत्रपती शिवाजी महारांजानी दिलेला विचार औरंगजेब नष्ट तर करू शकलाच नाही परंतु तो स्वत: इथे पवित्र भुमीत गाडला गेला, ओ आमच्या धर्मावर उलटला होता, आमची मंदिरे पाडत होता, आमच्या आया-बहिणीची अब्रू लुटत होता, तो इथेच संपला हा इतिहास आहे.
advertisement
अश्या परिस्थतीत त्याच्या कबरीजवळ जर सजावट असेल तर ती सजावट त्वरीत काढून टाकण्यात यावी. ती नुसती कबर दिसली पाहिजे. यापुढे कुठलाही सरकारी खर्च येथे होता कामा नये. जसे की रंगरंगोटी, दुरुस्ती, बांधकाम काहीच नको. तसेच इथे एक बोर्ड लावण्यात यावा, आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला...
त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शाळांच्या शैक्षणिक सहली तेथे आयोजित करण्यात याव्यात. जेणे करून आमच्या पुढील पिढीला आणि जगाला हे कळले पाहिजे की आम्ही कुणाला गाडलं आहे. त्याच प्रमाणे येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, जेणेकरून जो कोणी त्या कबरीवर फुल चादर चढविण्यास येईल, त्याच्यावर देशद्रोह्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा. आमच्या मागणीचा विचार करून यावर तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशी विनंती मनसेने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून केली आहे.
