अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह कोकणात येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील पाच दिवस महाराष्ट्राच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
advertisement
हवामान तज्ज्ञ अमित भारद्वाज यांनी दिली अपडेट
हवामान तज्ज्ञ अमित भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व मध्य अरबी समुद्रात दुसरं डिप्रेशन तयार झालं आहे. तिथेही वादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. डिप डिप्रेशनमुळे तयार होणारी टर्फ लाइन ही महाराष्ट्र, गुजरात पासून मध्य प्रदेशपर्यंत वर जाताना दिसत आहे. तर पश्चिम बंगालच्या खाडीतून मोठं चक्रीवादळ घोंगावतंय जे दक्षिणेकडील राज्यांसाठी धोका निर्माण करू शकतं. आज दक्षिणेकडील राज्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या दोन्हीचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होणार असून सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भ-मराठवाड्यासाठी ऑरेंज अलर्ट
आज संपूर्ण महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील. तळ कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस राहणार आहे. 28 ऑक्टोबर रोजी विदर्भ-मराठवाड्यात यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भाच्या आजूबाजूच्या पट्ट्यात रेड अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवश ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रात मोंथा चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा पावसाचं संकट आलं आहे.
मोंथा चक्रीवादळामुळे अवकाळी पावसाचं संकट
हवामान तज्ज्ञ अमित भारद्वाज यांच्या म्हणण्यांनुसार, 29 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा मध्य भारतात आणि महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात तळ कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राचा काही पट्ट्यात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार आहे. ३० ऑक्टोबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 31 ऑक्टोबर रोजी पावसाचा जोर कमी होईल आणि हलक्या स्वरुपाचा राहणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तूर्तास पावसाचा कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही.
कधी जाणार पाऊस?
मात्र सध्याचं वातावरण पाहता तेव्हा कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. मोंथा चक्रीवादळ कसं पुढे सरकतं यावर पुढचे 5 दिवस लक्ष राहणार आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही थेट नसला तरी हवामानावर होत आहे. सकाळी ऊन आणि दुपारनंतर मुसळधार पाऊस अशी परिस्थिती आहे. रविवारी आणि सोमवारी पहाटे देखील मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली होती. पुढचे चार दिवस पाऊस राहणार आहे.
महाराष्ट्रात पावसानं नुकसान
मागील आठवडाभरापासून विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागांसह उत्तर महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे आलेला कांदा, सोयाबीन, वेचणीवर आलेला कापूस, मका, टोमॅटो, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर पावसाच्या धसक्याने रायगडमधील भातकापणी ठप्प पडली असून, पुण्यात भातशेती पाण्याखाली गेली आहे. भुसावळ शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केलीय..पावसामुळे कापूस, सोयाबीन आणि केळीचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
मुसळधार पावसामुळे निफाडच्या लासलगाव-भरवस फाटा रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटलाय.. जीव धोक्यात घालून लोक पुराच्या पाण्यातून प्रवास करतायत.. पाण्यातून जाताना दोन दुचाकी धारक थोडक्यात बचावलेत. शहापूर तालुक्याला पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले, शहापूर शहरासह शहापूर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला.
