मिळालेल्या माहितीनुसार, मोताळा तालुक्यातील थड येथील एका शेतकऱ्याला त्यांच्या गट क्रमांक २३ मधील १.६२ हेक्टर शेतजमीन त्यांच्या भाच्याला विकायची होती. या व्यवहारासाठी सौदेपत्रक तयार करण्यात आले होते. ही जमीन भोगवटादार वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याची गरज होती, जेणेकरून विक्रीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल.
शेतकरी अशिक्षित असल्यामुळे त्यांचा भाचा या कामासाठी तहसीलदार हेमंत पाटील याला भेटला. याच संधीचा फायदा घेत भामट्या तहसिलदाराने या कामासाठी प्रति एकर ५० हजार रुपये याप्रमाणे एकूण दोन लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकोला यांच्याकडे तक्रार दाखल केली.
advertisement
तक्रारीची गंभीर दखल घेत एसीबीने १३ सप्टेंबर रोजी या तक्रारीची पडताळणी केली आणि त्यानंतर सापळा रचण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे, रविवार, १४ सप्टेंबर रोजी दुपारी तक्रारदाराने तहसीलदार पाटील यांना त्यांच्या निवासस्थानी दोन लाख रुपये दिले. जसे ही रक्कम पाटील यांनी स्वीकारली, त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. एसीबीच्या पथकाची चाहूल लागताच पाटील यांनी लगेच ती रक्कम शौचालयात फेकून दिली, परंतु एसीबीने ती तत्काळ हस्तगत केली. लाचखोर हेमंत पाटील विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.