भाडेवाढीचं कारण काय?
एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळात इंधन (डिझेल) आणि वंगण (Lubricants) यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. तसेच, बसच्या सुट्ट्या भागांचे दर वाढल्यामुळे गाड्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च आवाक्याबाहेर जात आहे. महामंडळाचे उत्पन्न आणि खर्च यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली असून ही आर्थिक तूट भरून काढण्यासाठी भाडेवाढ करणे अपरिहार्य असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. एसटीच्या सर्व प्रकारच्या बस प्रकारात तिकीट दर २ टक्क्यांची वाढ होणार आहे.
advertisement
आजच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष
या प्रस्तावावर अंतिम निर्णयासाठी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक आज, शुक्रवारी एक महत्त्वाची आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत भाडेवाढीच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा होऊन त्याला मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. सरकारने हिरवा कंदील दाखवल्यास येत्या काही दिवसांतच नवीन दर लागू होतील.
कोणत्या गाड्यांचे तिकीट वाढणार?
ही २ टक्के भाडेवाढ केवळ साध्या बसपुरती मर्यादित नसून, ती महामंडळाच्या सर्व श्रेणीतील गाड्यांना लागू असणार आहे.
ग्रामीण व निम-आरामदायी: साधी बस, मिडी (यशवंत), आणि हिरकणी.
वातानुकूलित व प्रीमियम सेवा: शिवशाही, शिवाई (इलेक्ट्रिक), अश्वमेध.
लांब पल्ल्याच्या गाड्या: आसनी-शयनयान (Sleeper) आणि विनावातानुकूलित शिवनेरी.
नवीन ताफा: ई-९ आणि १२ मीटर लांबीच्या सर्व इलेक्ट्रिक बसेस
प्रवाशांच्या रोषाची भीती?
यापूर्वी १४ जानेवारी २०२४ रोजी एसटीने तब्बल १४.९५ टक्क्यांची मोठी भाडेवाढ केली होती. त्यावेळी सर्वसामान्य प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. जनतेचा हा रोष पाहून परिवहन मंत्र्यांनी सूचना केली होती की, एकदम मोठी वाढ करण्यापेक्षा दरवर्षी टप्प्याटप्प्याने अल्प भाडेवाढ करावी, जेणेकरून प्रवाशांवर एकदम आर्थिक बोजा पडणार नाही. याच धोरणाचा भाग म्हणून आता ही २ टक्क्यांची नाममात्र भाडेवाढ केली जात असल्याचे समजते.
सर्वसामान्यांवर परिणाम
एसटी ही प्रामुख्याने शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांची वाहिनी आहे. आधीच महागाईने होरपळलेल्या ग्रामीण जनतेसाठी दोन टक्क्यांची वाढ ही किरकोळ वाटत असली, तरी रोज प्रवास करणाऱ्या नोकरदारांच्या मासिक बजेटवर याचा परिणाम नक्कीच होणार आहे. आता आजच्या बैठकीत शासन या प्रस्तावावर काय भूमिका घेते आणि ही भाडेवाढ कधीपासून लागू होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
