मुंबईच्या महापौर पदावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेंच सुरू असताना रेसमध्ये नसलेल्या ठाकरे गटाला महापौरपद द्यावं लागू शकतं, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नगर विकास खात्याच्या एका निर्णयामुळे मुंबईत ठाकरेंचा महापौर होऊ शकतो. असं झालं तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही पर्याय उरणार नाही. त्यांना काहीही करून ठाकरेंचाच महापौर करावा लागू शकतो.
advertisement
मुंबईत महापौर पदाचं समीकरण कसं बदलेल?
खरं तर, २९ महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी जाहीर होणार असल्याने सर्वच पक्षांचे लक्ष याकडं लागलं आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत प्रक्रिया पार पडणार आहे. चक्राकार पद्धतीने २९ शहरांचे महापौरपद कोणासाठी राखीव असेल, हे यावेळी निश्चित केले जाईल. या प्रक्रियेनंतरच मुंबईचा पुढील महापौर कोणत्या प्रवर्गाचा असेल, याचं चित्र स्पष्ट होणार आहे.
मात्र, या सोडतीमध्ये जर मुंबईचे महापौरपद अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी आरक्षित झाले, तर सत्ता असूनही भाजप-शिवसेना महायुतीला मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण सध्याच्या राजकीय समीकरणांनुसार, जर मुंबई महापौरपद अनुसूचित जमातीसाठी (ST) राखीव झाले, तर महायुतीकडे या प्रवर्गातील एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. मात्र शिवसेना (उबाठा) पक्षाचे दोन नगरसेवक या प्रवर्गातून निवडून आलेले आहेत. जितेंद्र वळवी (प्रभाग क्रमांक ५३), प्रियदर्शनी ठाकरे (प्रभाग क्रमांक १२१) दोघंही एसटी प्रभागातून निवडून आले आहेत.
महायुतीने खुल्या प्रवर्गातूनही एसटी समाजाचा कोणताही उमेदवार रिंगणात उतरवला नव्हता किंवा त्यांचा कोणताही असा उमेदवार निवडून आलेला नाही. त्यामुळे आरक्षण एसटीसाठी सोडलं तर ठाकरे गटाचा महापौर बिनविरोध निवडून येण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत संख्याबळ असूनही महायुतीला महापौरपदापासून दूर राहावे लागू शकते.
