मुंबईत कोणकोणत्या भागात म्हाडाची घरं?
सोडतीत मुंबईतील कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरीवली, गोराई-बोरीवली, सुभाष नगर-चेंबुर, गांधीनगर- वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा आदी गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये विविध उत्पन्न गटासाठी सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सदनिकांच्या किंमती म्हाडाच्या प्रचलित धोरणानुसार निश्चित करण्यात आल्या आहेत.
advertisement
घरं 'जशा आहे त्या स्थितीमध्ये' विक्रीकरिता उपलब्ध
विकासकांकडून प्राप्त सदनिका 'जशा आहे त्या स्थितीमध्ये' विक्रीकरिता उपलब्ध आहेत. म्हाडातर्फे या सदनिकांची ताबा देण्यापूर्वी डागडुजी, दुरूस्ती करून दिली जाईल. तसेच यशस्वी अर्जदाराला सोडतीत लागलेल्या सदनिकेचा मालमत्ता कर व सहकारी गृहनिर्माण संस्थेचा देखभाल खर्च थकीत असल्यास म्हाडातर्फे त्याची अदायगी करूनच सदनिकेचा ताबा यशस्वी अर्जदारांना दिला जाणार असल्याचे संजीव जयस्वाल यांनी यावेळी स्पष्ट केले.
अर्ज कसा करायचा?
मुंबई मंडळाच्या सोडतीत सहभागी होण्याकरिता https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळ व IHLMS 2.0 Integrated Mhada Housing Lottery System मोबाइल ॲप या संगणकीय प्रणालीद्वारेच म्हाडाच्या सोडतीमध्ये अर्ज करावा.
सोडत प्रक्रियेत नोंदणी करणे, आवश्यक कागदपत्रे सादर करणे, कागदपत्रांची पात्रता पडताळणी करणे, अर्ज करणे ते अनामत रकमेचा भरणा व सोडतीत घर लागल्यावर सदनिकेच्या रकमेचा भरणा करणे या सर्व बाबी पूर्णतः ऑनलाइन असल्याने अर्जदारांना म्हाडा कार्यालयात देखील यावे लागणार नाही. अशाप्रकारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही प्रणाली मानवी हस्तक्षेपविरहीत अत्यंत पारदर्शक, फेसलेस आहे. तसेच ही प्रणाली वेळोवेळी स्वयंचलित अद्ययावत होत आहे. नागरिकांना सोडतीत सहभाग घेण्याकरिता नोंदणी प्रक्रिया अमर्याद खुली राहणार आहे. नोंदणी प्रक्रियेनंतर अर्जदाराचे कायम स्वरूपी प्रोफाइल नूतन संगणकीय सोडत प्रणालीमध्ये तयार होणार आहे. अर्जदारांच्या अर्जाची अचूक पडताळणी या प्रणालीद्वारे त्वरित होणार आहे. अर्जदारांची पात्रता सोडतीच्या आधीच निश्चित होणार असून या प्रणालीने पात्र ठरविलेले अर्जदारच सोडतीत सहभाग घेऊ शकतील, अशी माहिती जयस्वाल यांनी यावेळी दिली. गेल्या वेळी झालेल्या सोडतीप्रमाणेच मुंबई मंडळाच्या या वर्षीच्या सोडतीला अर्जदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल, असा विश्वास संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केला.
म्हाडाचा अर्ज भरण्यासाठी कोणकोणती कागदपत्रांची आवश्यकता
अर्जदारांना नोंदणीसाठी व अर्ज भरण्यासाठी मोबाईल क्रमांक (आधार क्रमांकाशी संलग्न) व ई-मेल आय.डी. आवश्यक आहे. अर्जदारांना नोंदणीसाठी व पात्रतेसाठी १) आधार कार्ड, २) पॅन कार्ड, ३) अर्जदाराने जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून मागील सलग २० वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदारांचे किमान १५ वर्ष सलग वास्तव्य असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र (Domicile Certificate) ४) उत्पन्नाचा पुरावा म्हणून दि. ०१.०४.२०२४ ते ३१.०३.२०२५ (उत्पन्नाच्या पुराव्यासाठी आयकर विवरण पत्र अथवा तहसिलदार यांनी दिलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला ग्राहय धरला जाईल) आवश्यक आहे.
९७ विविध ठिकाणच्या गृहनिर्माण प्रकल्पांचा समावेश
सोडतीअंतर्गत एकूण ९७ विविध ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्पांचा समावेश असून, या सर्व ठिकाणांची गूगल लोकेशन माहिती अधिकृत संकेतस्थळ व मोबाइल ॲपवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अर्जदारांना अर्ज सादर करण्यापूर्वी इच्छित सदनिकांची पाहणी करता यावी, यासाठी म्हाडातर्फे संबंधित संपर्क कर्मचारी व त्यांचे संपर्क क्रमांकही अधिकृत संकेतस्थळ व ॲपवर येत्या २ ते ३ दिवसांत उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
