गणेश दुडम, प्रतिनिधी, पुणे: पुणे–मुंबई एक्सप्रेसवेवर रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकने बॅरियर ओलांडत थेट मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या लेनमध्ये प्रवेश केला आणि समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. हा धडक इतकी जबरदस्त होती की ट्रक कारच्या पुढील भागाजवळ उलटला. यामध्ये कारचा धडकेत चक्काचूर झाला.
advertisement
या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या कारमधील प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. गंभीर जखमींना सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवरील हा अपघात कामशेत येथे पुणे लेनवर किलोमीटर 68 ताजे पेट्रोल पंपा समोर पहाटे चार वाजता झाला.
दरम्यान, अपघातानंतर एक्सप्रेसवेवरील वाहतूक दीड तास ठप्प झाली होती. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर तब्बल दहा किलोमीटर लांबीची वाहनरांग लागली होती. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हलवल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
महामार्ग पोलिसांनी अपघातस्थळी पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
