एक्स्प्रेस हायवेवर अग्नितांडव
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून समतानगरच्या दिशेनं जात होती. रस्त्यावरून धावत असताना अचानक बसमधून धूर निघू लागला. काही कळण्याच्या आतच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीमुळे बसमध्ये मोठे आवाज (स्फोट) झाल्याने महामार्गावरील इतर वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, आग लागल्याचे लक्षात येताच बसमधील लोक वेळीच सुखरूप बाहेर पडले, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
advertisement
अग्निशमन दलाची धाव
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करून मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत बसचा सांगाडाच शिल्लक राहिला होता. या घटनेमुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतुकीचा वेग काही काळ मंदावला होता.
आगीचे कारण अस्पष्ट
बसला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. समता नगर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.
