नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा नामनिर्देशनपत्र सादर करण्याची सवलत देण्यात आली आहे. त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी (ता. 16) देखील सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचे आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
नामनिर्देशनपत्र व शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. अधिकाधिक इच्छूक उमेदवारांनी रविवारीच नामनिर्देशनपत्रे दाखल केल्यास अखेरच्या दिवशी ऐनवेळी होणारी धावपळ टळू शकेल, असेही राज्य निवडणूक आयोगाने आपल्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.
advertisement
राज्यातील सर्वच नगर परिषद आणि नगर पंचायतीची विहित मुदत संपुष्टात आली होती. आधी ओबीसी आरक्षण आणि नंतर काही तांत्रिक कारणाने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून निवडणुका रखडलेल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्ग मोकळा झालेला असून पहिल्या टप्प्यांत नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची घोषणा झाली. पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणूक होणार आहे.
निवडणूक कार्यक्रम कसा असणार?
-अर्ज दाखल करण्याची तारीख -१० नोव्हेंबर २०२५
-अर्ज दाखल अंतिम मुदत- १७ नोव्हेंबर २०२५
-छाननीची तारीख-१८नोव्हेंबर २०२५
-माघार घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर २०२५
-अपील नसलेल्या ठिकाणी अंतिम मुदत- २५ नोव्हेंबर २०२५
-निवडणूक चिन्ह आणि अंतिम यादी- २६ नोव्हेंबर २०२५
-मतदानाचा दिवस -२ डिसेंबर २०२५
