दोन्ही जागांवर हक्क का?
शिवसेना ठाकरे नेत्यांच्या मते, महाविकास आघाडीत त्यांचा पक्ष मोठा घटक आहे आणि त्यांची संघटनात्मक ताकद पाहता दोन्ही जागांवर त्यांचा दावा रास्त आहे. खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य करताना म्हटले की, "उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा विधान परिषदेची उमेदवारी घ्यावी, अशी आघाडीतील सर्वच नेत्यांची इच्छा आहे. मात्र, त्याच वेळी राज्यसभेच्या जागेवरही दावा कायम ठेवून ठाकरे गटाने 'बार्गेनिंग पॉवर' वाढवली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
ठाकरे गटाला एका जागेवर पाणी सोडावे लागणार?
राजकीय विश्लेषकांच्या मते, शिवसेना (ठाकरे गट) राज्यसभा आणि विधान परिषद या दोन्ही जागा स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करत असली, तरी मित्रपक्षांना सोबत ठेवताना हे सोपे नसेल. जर उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून कायम ठेवायचे असेल, तर त्यांना राज्यसभेची जागा काँग्रेससाठी सोडावी लागू शकते. एकाच वेळी दोन्ही पदे पदरात पाडून घेणे सध्याच्या परिस्थितीत अशक्य वाटत असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले.
काँग्रेसचा 'चेकमेट' देण्याचा प्रयत्न
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, उद्धव ठाकरेंनी विधान परिषद लढवावी आणि काँग्रेसला राज्यसभेची जागा द्यावी. मात्र, संजय राऊत यांनी "तिन्ही पक्ष एकत्र बसून ठरवतील" असे म्हणत राज्यसभा सोडण्याचे स्पष्ट संकेत दिलेले नाहीत. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आपले पत्ते अद्याप उघडले नाहीत. शरद पवार यांच्या उमेदवारीवर ठाकरे गट सहमत आहे. तर, काँग्रेसकडून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर साशंकता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसने पवारांच्या उमेदवारीबाबत कोणतेही उघड भाष्य केले नाही.
