बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील सुपूत्राला वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी वीरमरण आलं आहे. मेहकर तालुक्यातील आरेगावमधील जवान त्रिपुरामध्ये कर्तव्यावर असताना शहीद झाला आहे. नागेश राक्षे असं या जवानाचं नाव आहे. नागेश राक्षे हे बीएसएफमध्ये भरती झाले होते. सीमा सुरक्षा दलात एरिया नॉमिनेशन करत असताना ते शहीद झाले.
जवान नागेश राक्षे यांचं पार्थिव 26 एप्रिलला सकाळच्या सुमारास त्यांच्या मूळ गावी आरेगाव येथे आणण्यात येणार आहे, असं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे.
advertisement
नागेश राक्षे 2021 साली सैन्य दलात भरती झाले होते. त्यांनी सैन्य दलातील सुरक्षा बजावत आसाममधील प्रशिक्षण केंद्रात परीक्षण पूर्ण केलं. यानंतर त्यांनी त्रिपुरा कोलकाता बांगलादेश बॉर्डर मिझोराम येथे सेवा बजावली. आता त्रिपुरामधील कंचनपूर कॅम्पमध्ये ते कार्यरत होते, अशी माहिती नागेश राक्षे यांच्या नातेवाईकांनी दिली.
नागेश राक्षे यांच्यावर त्यांचं मूळ गाव आरेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नागेश राक्षे यांना वीरमरण आल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. तहसीलदार निलेश मडके यांनी शहीद नागेश राक्षे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन केलं आणि अंत्यसंस्काराबद्दल माहिती दिली.
