बालाजी कल्याणे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर रती देशमुख असं आरोपी तरुणीचं नाव आहे. आरोपी रती देशमुख ही बीएएमएसची विद्यार्थिनी असून सध्या ती इंटर्नशिप करत होती. मागील चार वर्षांपासून तिचे बालाजी कल्याणेसोबत प्रेमसंबंध सुरू होते. बालाजीला रतीसोबत लग्न करायचं होतं. त्यासाठी त्याने तगादा लावला होता. मात्र तरुणीने थेट आपल्या प्रियकराचाच खून केला आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक बालाजी कल्याणे आणि आरोपी रती देशमुख यांच्यात गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, त्यांच्या लग्नावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होता. याच वादातून बुधवारी रात्री रतीने बालाजीवर चाकूने वार केले, ज्यात बालाजीचा जागीच मृत्यू झाला. इतकेच नव्हे तर, प्रियकराची हत्या केल्यानंतर रतीने स्वतः देखील आत्महत्येचा प्रयत्न केला.
रक्तबंबाळ अवस्थेत आढळल्यामुळे रती देशमुखला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर अद्याप उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर होताच पोलीस तिला ताब्यात घेतील.
हत्येपूर्वी वडिलांना अल्टिमेटम
पोलिसांनी मयत बालाजीच्या मोबाईलची तपासणी केली असता एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बालाजीने हत्येच्या अवघ्या एक दिवस आधी रतीच्या वडिलांना अल्टिमेटम दिला होता. "जर आमचे लग्न झाले नाही, तर माझ्या मरणासाठी तुम्हाला नागपूरला यावं लागेल," असा संदेश त्याने रतीच्या वडिलांना पाठवला होता. यावरून लग्नासाठी बालाजी किती टोकाची भूमिका घेत होता हे स्पष्ट होते.
मृतक बालाजीचा भाऊ ऋषिकेश कल्याणे याच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपी रती देशमुख हिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. चार वर्षांच्या प्रेमसंबंधाचा असा रक्तरंजित अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
