नेमकी घटना काय?
कमलप्रीत सिंग असं हत्या झालेल्या १७ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो गोवर्धन घाट भागातील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास कमलप्रीत हा गोवर्धन घाट पुलाजवळून जात असताना दोन तरुणांनी त्याला अडवले. काही कळायच्या आतच या दोघांनी त्याच्यावर चाकूने हल्ला चढवला. कमलप्रीतच्या पोटावर चाकूचे खोलवर वार करण्यात आले, ज्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला.
advertisement
जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट
पोलीस तपासात या हत्येमागे आठ-दहा दिवसांपूर्वी झालेला वाद कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. कमलप्रीतचा त्याच्या काही मित्रांसोबत आठवड्याभरापूर्वी वाद झाला होता, ज्यामध्ये कमलप्रीतने समोरच्या गटाला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. याच मारहाणीचा आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी रविवारी दुपारी सापळा रचला आणि कमलप्रीतवर जीवघेणा हल्ला केला.
उपचारादरम्यान मृत्यू
हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या कमलप्रीतला तातडीने कौठा भागातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले, मात्र पोटावर झालेले वार वर्मी लागल्याने त्याची प्रकृती खालावली आणि उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी दोन संशयित आरोपींची ओळख पटली असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
