पीडित महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी तो एका विशिष्ट प्रकारचे 'खारट पाणी' आणि 'पेढ्यांचा' वापर करत होता, ज्याचा तपास आता पोलीस यंत्रणा करत आहे. खरातचा हा प्रसाद खाताच महिला त्याच्या सुचनांचे पालन करत असे.
गुंगी आणणारे ते 'गूढ' द्रव नेमके काय?
एसआयटीने न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, खरात आपल्या केबिनमध्ये येणाऱ्या महिलांना काहीतरी द्रव पदार्थ प्यायला द्यायचा आणि पेढा खायला लावायचा. हे पदार्थ सेवन केल्यानंतर अवघ्या काही वेळातच महिलांना मळमळणे, डोके गरगरणे किंवा डोके जड होण्यासारखे प्रकार घडत होते. महिला अर्धवट शुद्धीत असताना किंवा गुंगीच्या प्रभावाखाली असताना खरात केबिनमधील दिवे बंद करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असे. या पदार्थांच्या प्रभावामुळे पीडित महिला पूर्णपणे खरातच्या इशाऱ्यावर चालत असत.
advertisement
तपासात खरात बोलेना... पोलीस कोठडीत वाढ
या प्रकरणातील सर्वात मोठे गूढ म्हणजे खरात महिलांना जे खारट किंवा कडवट चवीचे औषध द्यायचा, त्यात नेमके कोणते घटक होते? तसेच त्या पेढ्यांमध्ये गुंगी आणणारे कोणते रसायन मिसळले जायचे? या प्रश्नांची उत्तरे शोधणे अद्याप बाकी आहे. सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात सांगितले की, खरात तपासात सहकार्य करत नसून या औषधांबाबत कोणतीही ठोस माहिती देत नाहीये. त्यामुळे या गुढ घटकांचा पर्दाफाश करण्यासाठी खरातची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत एसआयटी या 'विषारी' पेढ्यांचा आणि द्रव पदार्थाचा स्त्रोत शोधण्यात यशस्वी होते का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
