नाशिक : वर्षाच्या अखेरच्या दिवशी नाशिक शहरातील राजकारण अक्षरशः तापले असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्येच मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. उमेदवारी अर्जांच्या छाननीच्या दिवशी प्रभाग क्रमांक २९, २५ आणि २६ मध्ये एकाच प्रभागासाठी एकापेक्षा अधिक उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली. विशेष म्हणजे या वादात दोन माजी नगरसेवक आणि माजी नगरसेविकांचा समावेश असल्याने हा प्रकार अधिकच चर्चेचा ठरला.
advertisement
प्रकरण काय?
प्रभाग २९ मधील ‘अ’ गटासाठी भाजपकडून दीपक बडगुजर आणि मुकेश शहाणे या दोघांनी अधिकृत एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज सादर केले होते. बुधवारी (दि. ३१) सकाळी अर्ज छाननी सुरू असताना दोन्ही उमेदवारांनी एकाच पक्षाचा एबी फॉर्म जोडल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. यामुळे छाननी प्रक्रियेदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले. अर्ज तपासणीदरम्यान दीपक बडगुजर यांनी आधी अर्ज सादर केल्याचे स्पष्ट झाल्याने, निवडणूक अधिकाऱ्यांनी मुकेश शहाणे यांचा एबी फॉर्म अवैध ठरवला.
या निर्णयाला शहाणे यांनी तत्काळ हरकत घेतली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व हरकतींवरील अंतिम निर्णय दुपारी तीन वाजल्यानंतर दिला जाईल, असे जाहीर केले. या घोषणेनंतर दोन्ही गटांचे समर्थक मोठ्या संख्येने निवडणूक कार्यालय परिसरात जमा होऊ लागले. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त वाढवला.
दरम्यान, दोन्ही बाजूंच्या वकिलांचे सविस्तर युक्तिवाद ऐकून घेण्यात आले. सुमारे दोन तास निकाल राखून ठेवण्यात आला होता. या काळात परिसरात तणाव कायम होता. अखेर निर्णय देताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केवळ दीपक बडगुजर आणि मुकेश शहाणे यांनाच कक्षात बोलावले. दोघांच्या हातात निर्णयाची प्रत देण्यात आली. त्यानुसार मुकेश शहाणे यांचा एबी फॉर्म अवैध ठरवण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
निर्णयानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी खबरदारी घेतली. शहाणे यांना पोलीस बंदोबस्तात बाहेर नेण्यात आले, तर बडगुजर यांना काही काळ कार्यालयातच थांबवण्यात आले. शहाणे माध्यमांशी संवाद साधत असताना, कोणताही वाद उद्भवू नये म्हणून पोलिसांनी बडगुजर यांना वेगळ्या मार्गाने बाहेर नेले. पोलिसांच्या तत्परतेमुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
निवडणुकीला सामोरे जाणार
या निकालानंतर मुकेश शहाणे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. “पहिला अधिकृत एबी फॉर्म मला देण्यात आला होता. मात्र चुकीच्या पद्धतीने दुसरा एबी फॉर्म सादर करून माझ्यावर अन्याय करण्यात आला. मी सर्वसामान्य कुटुंबातून आलो असून माझ्या पाठीशी कोणतेही मोठे राजकीय पाठबळ नाही. तरीही प्रभागातील मतदार माझ्या सोबत आहेत. हा अन्याय मी स्वीकारणार नाही आणि निवडणुकीला सामोरे जाणारच,” असे ते म्हणाले.
तर दुसरीकडे दीपक बडगुजर यांनी “पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
