पहिल्या दोन तासांत कल स्पष्ट होण्याची शक्यता
महानगरपालिकेच्या ३१ प्रभागांतील एकूण १२२ जागांसाठी ही निवडणूक पार पडली आहे. प्रशासनाच्या अंदाजानुसार मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्याच दोन तासांत बहुतेक प्रभागांतील निकालांचे कल स्पष्ट होतील. सकाळी १० वाजता मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत अनेक प्रभागांचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे.
advertisement
९ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती
मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे. सुमारे ९ हजार अधिकारी व कर्मचारी मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आले असून, त्यांना पूर्वतयारी व आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतमोजणीच्या दिवशी कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी वाहतूक, पोलीस आणि महापालिका प्रशासनामध्ये समन्वय साधण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रांच्या परिसरात वाहतूक सुरळीत राहावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
असे आहे मतमोजणीचे नियोजन
शहरातील ९ ठिकाणी एकूण १० मतमोजणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. प्रत्येक प्रभागासाठी २० ते २८ फेर्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. प्रभाग क्रमांक १५ आणि २० हे तीन सदस्यांचे प्रभाग असल्याने त्यांचा निकाल सर्वात आधी लागण्याची शक्यता आहे. मतदान यंत्रांची सरमिसळ करून टेबलांवर मोजणी करण्यात येणार असून, एक फेरी पूर्ण झाल्यानंतरच पुढील फेरी सुरू केली जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही निरीक्षण, प्रवेश नियंत्रण आणि आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रांच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
प्रभागनिहाय मतमोजणी केंद्रे
प्रभाग १, २, ३ आणि ४, ५, ६ – मीनाताई ठाकरे स्टेडियम, पंचवटी
प्रभाग ७, १२, २४ – दादासाहेब गायकवाड सभागृह, मुंबई नाका
प्रभाग १३, १४, १५ – वंदे मातरम् सभागृह, डीजीपीनगर, नाशिक
प्रभाग १६, २३, ३० – अटल दिव्यांग स्वाभिमान भवन, मुंबई नाका
प्रभाग १७, १८, १९ – शासकीय तंत्रनिकेतन, सामनगाव रोड, नाशिकरोड
प्रभाग २०, २१, २२ – नाशिकरोड विभागीय कार्यालय, नाशिकरोड
प्रभाग २५, २६, २८ – प्रबोधनकार ठाकरे सभागृह, अंबड पोलीस ठाणे मार्ग, नवीन नाशिक
प्रभाग २७, २९, ३१ – राजे संभाजी स्टेडियम, नवीन नाशिक
प्रभाग ८, ९, १०, ११ – सातपूर क्लब हाउस, सातपूर
राजकीय हालचालींना वेग
मतमोजणीपूर्वीच शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून, सर्वच पक्षांचे नेते निकालाबाबत आशावादी आहेत. कोणता पक्ष किंवा आघाडी बहुमत मिळवते, यावर नाशिकच्या पुढील विकासाची दिशा ठरणार आहे. त्यामुळे आजचा दिवस नाशिकच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
