नाशिक : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता मतदानाच्या अगदी तोंडावर नाशिकमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अधिकृत प्रचार थांबला असला, तरी पडद्यामागील राजकारण चांगलेच रंगताना दिसत आहे. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना नाशिकच्या प्रभाग क्रमांक २९ मध्ये घडलेल्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
मनसेकडून पाठिंबा जाहीर
या प्रभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. मनसेकडून याबाबतचे अधिकृत पत्रही प्रसिद्ध करण्यात आले असून, त्यामुळे निवडणुकीच्या समीकरणांमध्ये अचानक बदल झाला आहे. विशेष म्हणजे मुकेश शहाणे हे मूळ भाजपचे उमेदवार होते. मात्र, भाजपकडून बंडखोरी करत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे पक्षाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली होती.
दीपक बडगुजरांना धक्का
भाजपकडून झालेल्या कारवाईनंतर मुकेश शहाणे यांचे राजकीय भवितव्य काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच मनसेने त्यांना जाहीर पाठिंबा दिल्याने या प्रभागातील लढत अधिकच चुरशीची बनली आहे. मनसेच्या या निर्णयामुळे भाजप अधिकृत उमेदवार दीपक बडगुजर यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
प्रभाग क्रमांक २९ मध्ये निवडणूक जाहीर झाल्यापासूनच हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. सुरुवातीला भाजपकडून मुकेश शहाणे आणि दीपक बडगुजर या दोघांनाही उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, उमेदवारी प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. दीपक बडगुजर यांनी आधी एबी फॉर्म भरल्यामुळे मुकेश शहाणे यांचा एबी फॉर्म बाद झाला. त्यामुळे अधिकृत उमेदवार म्हणून दीपक बडगुजर यांचे नाव निश्चित झाले.
तरीदेखील, आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत मुकेश शहाणे यांनी माघार न घेता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली होती. पक्षशिस्तीचा भंग केल्याच्या कारणावरून भाजपने मुकेश शहाणे यांच्यावर कारवाई करत त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला.
आता मनसेने दिलेल्या जाहीर पाठिंब्यामुळे या प्रभागातील राजकीय गणिते पूर्णपणे बदलली आहेत. मनसेचे मतदार, तसेच भाजपमधील नाराज गटाची मते मुकेश शहाणे यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक २९ मधील लढत अटीतटीची होण्याची चिन्हे आहेत.
