नाशिक : गेल्या चार दिवसांपासून अधिकृत उमेदवारी मिळवण्यासाठी सुरू असलेली रस्सीखेच, राजकीय डावपेच, आरोप-प्रत्यारोप आणि गदारोळ अखेर शुक्रवारी (दि. २ ) संपुष्टात आला. १२२ जागांसाठी दाखल झालेल्या १,३९५ उमेदवारी अर्जांपैकी शेवटच्या दिवशी तब्बल ६६६ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता ७२९ उमेदवार महापालिका निवडणुकीच्या मैदानात अंतिमरित्या आपले नशीब आजमावणार आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्वाधिक २४६ उमेदवार रिंगणात असून, शिंदेसेना–राष्ट्रवादी (अप) युतीचे १४४ आणि भाजपचे ११८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. परिणामी अनेक प्रभागांमध्ये तिरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी लढती पाहायला मिळणार आहेत. विशेषतः ३० प्रभागांतील लढती राजकीयदृष्ट्या अत्यंत चुरशीच्या ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
advertisement
उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला होता. विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी टाळण्यासाठी इच्छुकांची मनधरणी करत दिवसभर धावपळ केली. मंत्री गिरीश महाजन यांनी विल्होळी येथील आपल्या बंगल्यावर ठाण मांडत अनेक इच्छुकांना थेट फोन करून उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली. शहरातील तिन्ही आमदारांसह शिंदेसेना आणि इतर पक्षांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनीही आपल्या-आपल्या पक्षातील उमेदवारांशी चर्चा करत बंडखोरीचा फटका बसू नये यासाठी प्रयत्न केले.
दरम्यान, भाजपमधील रुची कुंभारकर, मुकेश शहाणे, सतीश सोनवणे आणि शशिकांत जाधव यांनी पक्षाच्या निर्णयाविरोधात भूमिका घेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार कायम ठेवला. विशेषतः शशिकांत जाधव हे दिवसभर संपर्काबाहेर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. तसेच वर्षा भालेराव आणि अजिंक्य फरांदे यांचे निकटवर्तीय मित्र अक्षय गांगुर्डे हेही बराच वेळ नॉट रिचेबल राहिल्याने पूर्व विभागात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, शेवटी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काही प्रमाणात राजकीय तणाव निवळला आहे.
टॉप 30 लक्षवेधी लढतींची संपूर्ण यादी
प्र.१- अरुण पवार (भाजप) x प्रवीण जाधव (शिंदेसेना)
प्र. २- मच्छिंद्र सानप (भाजप) रुची कुंभारकर (अपक्ष)
प्र.५- गुरुमित बन्या (भाजप) X अशोक मुर्तडक (शिंदेसेना)
प्र.५-खंडू बोडके (भाजप) X कमलेश बोडके (शिंदेसेना)
प्र. ७-योगेश हिरे (भाजप) X अजय बोरस्ते (शिंदेसेना)
प्र. ९- अमोल पाटील (भाजप) X प्रेम पाटील (शिंदेसेना)
प्र. १०- विश्वास नागरे (भाजप) X शशी जाधव (अपक्ष)
प्र. ११- बाळा निगळ (भाजप) X सलीम शेख (मनसे) X लोंढे (रिपाई)
प्र. ११-सीमा निगळ (शिंदेसेना) X वसुधा कराड (भाकप)
प्र. १२- शिवाजी गांगुर्डे (भाजप) X समीर कांबळे (शिंदेसेना)
प्र. १२-नूपुर सावजी (भाजप) X हेमलता पाटील (राष्ट्रवादी अप)
प्र. १३- आदिती पांडे (भाजप) X रश्मी भोसले (शिंदेसेना) X वस्तला खैरे (कॉंग्रेस)
प्र. १३- शाहू खोरे (भाजप) X गणेश मोरे (शिंदेसेना)
प्र. १३- बबलू शेलार (भाजप) X संजय चव्हाण (उबाठा)
प्र. १४- सुफी जीन (काँग्रेस) X शेख मुजातीद (राष्ट्रवादी शप)
प्र. १५- मिलिंद भालेराव (भाजप) X प्रथमेश गिते (उद्धवसेना)
प्र. १६-कुणाल वध (भाजप) X राहुल दिवे (शिंदेसेना)
प्र. १७-दिनकर आढाव (भाजप) X राजेश आढाव (शिंदेसेना)
प्र. १७- प्रशांत दिवे (भाजप) X मंगेश मोरे (उद्धवसेना)
प्र. १८- विशाल संगमनेरे (भाजप) X सुनील बोराडे (शिंदेसेना)
प्र. २०- संभाजी मोहनकर (भाजप) X कैरवस मुरलीपार (शिंदेसेना)
प्र. २१- जयंत जाचक (भाजप) X सूर्यकांत लवटे (भाजप)
प्र. २२- केशव पोरजे (उद्धवसेना) X विक्रम कोळे (राष्ट्रवादी अप)
प्र. २४- कैलास चुंबळे (भाजप) X प्रवीण तिदमे (शिंदेसेना)
प्र. २६-अलका आहिरे (भाजप) X हर्षदा गायकर (शिंदेसेना)
प्र. २७- कावेरी घुगे (भाजप) X किरण दराडे (शिंदेसेना)
प्र. २७-प्रियंका दोंदे (भाजप) X आशा खरात (राष्ट्रवादी अप)
प्र. २९- दिपक बडगुजर (भाजप) x मुकेश राहाणे (अपक्ष)
प्र. ३०-अजिंक्य साने (भाजप) X सतिश सोनवणे (अपक्ष)
प्र. ३९- सुदाम डेमसे (शिंदेसेना) X सुदाम कोंबडे (मनसे)
