रिंगरोडसाठी जमिनीचा ग्रीन सिग्नल मिळाला
नाशिक शहरालगत असलेल्या प्रस्तावित बाह्य रिंगरोड प्रकल्पाची चर्चा सध्या होत असून यासाठी एकूण 364 हेक्टर जमिनीची गरज आहे. या प्रकल्पासाठी खासगी जमिनी थेट खरेदी पद्धतीने घेण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारीपर्यंत 134.2 हेक्टर खासगी जमिनींसाठी जमीनमालकांची संमतीपत्रे मिळाली आहेत. तसेच 16 गटांमधील सुमारे 20 हेक्टर शासकीय जमीनही उपलब्ध आहे. त्यामुळे आवश्यक जमिनीपैकी जवळपास निम्मी जमीन उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
advertisement
किती गावातून जाणार हा मार्ग
हा 65.1 किलोमीटर लांबीचा रिंगरोड शहरालगतच्या 25 गावांतून जाणार आहे. प्रकल्पासाठी खासगी जमिनी थेट खरेदी करण्यासाठी जमीनमालकांची लेखी संमती आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाने 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. मात्र, काही शेतकऱ्यांनी मुदत वाढवण्याची मागणी केली आहे. प्रशासनाकडून मुदत वाढवण्याचा विचार सुरू असून 51 टक्के जमिनींसाठी संमती मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान अनेक जमिनी वडिलोपार्जित किंवा संयुक्त नावावर असल्याने नेमके क्षेत्र किती आणि कुठे आहे याबाबत अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे पोटहिस्से करूनच संमतीपत्र आणि खरेदी प्रक्रिया सुरू करावी अशी जमीनमालकांची मागणी आहे. आमदार हिरामण खोसकर यांनीही शेतकऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मुदत वाढवण्याची विनंती केली असून प्रशासनाने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
