नाशिक : नाशिक शहर अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. खाद्यपदार्थांसाठी देखील जगभरात प्रसिद्ध आहे. नाशिक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे खाद्यपदार्थ खायला मिळतात. त्यामुळे नाशिक शहरातील खाद्यपदार्थांची नेहमीच चर्चा रंगते. अशातच नाशिकच्या ओझरजवळील विमानतळानजीक एका 74 वर्षांच्या भीमाबाई जोंधळे यांनी सुरू केलेले ‘हॉटेल रिलॅक्स कॉर्नर’ तसेच त्याचे प्रसिद्ध असे आजीचे पुस्तक असे नाव सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.
advertisement
हॉटेलमध्ये आल्यावर जेवणाची ऑर्डर येइपर्यंत पुस्तकाशी मैत्री व्हावी अन् त्यातून वाचनाची गोडी लागावी, या संकल्पनेतून उभे राहिलेले ‘पुस्तकांचे हॉटेल’ वाचन चळवळीला एक नवी दिशा देत आहे. मोबाइलचा मर्यादित वापर करून प्रत्येकाने वाचनाकडे वळावे, ही आजींची आग्रही भूमिका आहे. आजीबाईंनी आपल्या हॉटेलमध्ये चमचमीत जेवणासोबत अस्सल दर्जेदार पुस्तकांची देखील मेजवानी उपलब्ध करून दिली आहे.
या ठिकाणी आपल्याला सर्व प्रकारचे पुस्तके उपलब्ध करून दिले आहेत. हॉटेल रिलॅक्स कॉर्नरमध्ये बसल्यानंतर जणू ग्रंथालयात बसल्याचा भास होतो. अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी या अनोख्या उपक्रमाची मांडणी केली आहे. त्यात त्यांना त्यांचा मुलगा प्रवीण यांची ही मोलाची साथ मिळाली आहे. हॉटेलच्या भिंती नाशिकच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देतात. तसेच याठिकाणी कवितेची भिंत, पुस्तकांची सिजोरी आपल्या दिसेल.
तुम्हाला हवं ते पुस्तक इथं वाचायला मिळतं. जेवणासोबत खवय्ये पुस्तकं वाचण्याचा ही भरभरून आनंद घेतात. तुम्ही बसलेल्या टेबलवर चार ते पाच पुस्तकं वेगवेगळी ठेवलेली असतात. ती जर तुम्हाला आवडली नाहीत तर शेजारी असलेल्या अलमारीतून तुम्ही हवे ते पुस्तक घेऊ शकतात. तसेच आपण जेवणदेखील आपल्या हाताने पाटीवर लिहून ऑर्डर करू शकतो.
मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत इतकेच नव्हे तर अनेक इतिहासकरांचे पुस्तक देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. लहान मुलांना देखील या ठिकाणी त्यांच्या मनोरंजनासाठी अनेक पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध आहेत.
आज सर्वत्र पुस्तकांची आई म्हणून ओळखल्या जाणारे भीमाबाई यांनी गरिबीचे चटके सोसून चहाच्या टपरीपासून सुरुवात करून तटावरच्या हॉटेलची कल्पना सुचली. आजीबाईंनी अतिशय गरिबीतून दिवस काढले आहेत. त्या सांगतात, त्यांच्या शेतीतही काही चांगले पिक येत नव्हते. त्यामुळे काय करावे, घर कसे चालवावे, असा प्रश्न माझ्यासमोर होता. तेव्हा मी या ठिकाणी एक छोटीशी चहाची टपरी सुरू केली. तेव्हापासून व्यवसाय करावा, असे वाटत होते. पण व्यवसाय चालेल की नाही, याची शास्वती नव्हती.
लाडक्या बहीण योजनेचे पैसे अजूनही खात्यात जमा झाले नाहीत?, ही आहेत त्यामागचे कारणं, आताच वाचा..
पण मी आणि मुलगा प्रवीणने असे ठरवले की, आपण काही तरी वेगळं करुया, ज्यामुळे समाजात देखील चांगला संदेश जाईल. प्रवीणला आणि मला अगोदर पासूनच वाचनाची आवड होती. त्यामुळे वाचन संस्कृतीला प्रेरणा मिळेल या हेतूने आम्ही या हॉटेलमध्येच पुस्तके ठेवण्याचा विचार केला. 25 पुस्तकांपासून चालू झालेला हा प्रवास आज 5 हजार पुस्तकांवर आला आहे.
इतकेच नव्हे तर हे दवाखान्यात दाखल झालेल्या रुग्णांना कंटाळा नको म्हणून दवाखान्यातही ते पुस्तके पुरवतात. आमच्याकडे तुम्ही जेवणाला आले आणि जेवण जरी नाही केला फक्त पुस्तकाचा आनंद जरी वाचून घेतला तर मला समाधान आहे, असे भिमाबाई आजी म्हणतात. त्यांचा हा उपक्रम बघता बघता आता लोकांच्या पसंतीस उतरला आहे. भिमाबाईच्या हातची पिठलं- भाकरी चांगलीच फेमस आहे. त्या स्वतः आपल्या हाताने जेवण बनवतात. नाशिक शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर ओझरजवळ हे हॉटेल आहे. तुम्हीही या ठिकाणी नक्कीच भेट देऊ शकतात.