नाशिक: नाशिक शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. इथं एका अल्पवयीन मुलाने दोन जणांची निर्घृण हत्या केली आहे. पहिला खून केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याला बालसुधारगृहात पाठवलं होतं. पण तो बालसुधारगृहातून पळून आला. बाहेर येताच त्याने मुंबई नाक्यावर दुसरा खून केला आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
advertisement
मुंबई नाका परिसरात लघुशंका करण्यावरून हटकल्याच्या क्षुल्लक कारणावरून या मुलाने एका फिरस्ती व्यक्तीची धारदार चाकूने वार करून हत्या केली. या घटनेमुळे नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या अल्पवयीन मुलाने काही दिवसांपूर्वी अन् एका दुसऱ्या व्यक्तीचा खून केला होता. 'मैत्रीची छेड का काढली?' असा जाब विचारत त्याने ठक्कर बाजार बसस्थानक परिसरात एका इसमाला संपवलं होतं. आता त्याने दुसरी हत्या केली आहे.
बालसुधारगृहातून पळाला अन् दुसरी हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन गुन्हेगार काही दिवसांपूर्वी बाल सुधारगृहातून पळून गेला होता. पलायन केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी तो मुंबई नाका परिसरात होता. तिथे तो लघुशंका करत असताना बंडू गांगुर्डे नावाच्या ३५ वर्षीय फिरस्ती मजुराने त्याला हटकलं. त्या ठिकाणी लघुशंका करू नकोस, अशी समज दिली. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
याच रागातून अल्पवयीन मुलाने धारदार चाकू काढला आणि बंडू गांगुर्डे यांच्या छातीवर आणि पोटावर अनेक वार केले. गंभीर जखमी झालेल्या बंडू गांगुर्डे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अल्पवयीन मुलाने अशाप्रकारे सलग दुसरी हत्या केल्यामुळे नाशिकमधील नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.