नेमकी घटना काय?
सातपूर येथील कार्बन नाका परिसरातील एक युवती काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. तिच्या वडिलांनी सातपूर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलीस तिचा शोध घेत होते, मात्र तिचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. दोन दिवसांनी पीडित तरुणीनं आपल्या वडिलांना गुपचूप फोन करून आपल्या वडिलांना हकीकत सांगितली. राणी आणि भागी नावाच्या दोन महिलांनी तिला मालेगाव येथे इव्हेंटच्या कामासाठी नेले आणि तिथून तिला नांदगावला नेऊन २ लाख रुपयांना विकल्याचे तिनं रडत सांगितलं.
advertisement
पोलीस पथकाला ग्रामस्थांचा घेराव
या घटनेची माहिती मिळताच सातगाव पोलिसांनी तातडीनं नांदगाव गाठलं. स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध घेतला असता, ती तरुणी जातेगाव येथील नवनाथ शिरडकर याच्या घरी आढळून आली. मात्र, पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच गावातील २०० ते ३०० लोकांनी पोलीस पथकाला घेराव घातला. "आम्ही दोन लाख रुपये देऊन लग्न केले आहे, मुलगी देणार नाही," असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. यामुळे गावात मोठा तणाव निर्माण झाला होता.
अखेर सुटका आणि रॅकेटचा संशय
मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सातगाव पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने पीडित तरुणीला सुरक्षितपणे ताब्यात घेतलं आणि नाशिकला आणलं. पोलिसांनी पीडित तरुणीची चौकशी केली असता दोन महिलांनी इव्हेंटच्या कामासाठी नेऊन लग्न लावल्याचं तिनं सांगितलं. पोलीस संबंधित दोन महिलांचा शोध घेत आहेत. आता या मागे मोठं रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
गरीब घरातील तरुणींना कामाचं आमिष दाखवून न्यायचं आणि त्यांची बळजबरीने विक्री करायची, असं मोठं रॅकेट यामागं सक्रिय असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलीस सध्या संशयित आरोपी महिला राणी आणि भागी यांच्या मागावर आहेत. त्यांच्या अटकेनंतर या घटनेचा सविस्तर खुलासा होण्याची शक्यता आहे.
