नाशिक : सर्वत्र आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. नाशिक शहरात व परिसरात मोठ्या उत्साहात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. बुधवारी गणेशोत्सवाचा पाचवा दिवस पार पडला आणि तसेच येत्या सोमवारी म्हणजे गणेश विसर्जनाच्या दिवशी नाशिक शहरातील पोलिसांकडून नियोजन करण्यात आले.
वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत वाहतूक शाखेकडून शहरातील एकूण 12 मार्गांवर वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याबाबतची अधिक माहिती वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, नाशिक शहर आणि तसेच परिसरात गणेश उत्सवाच्या काळात गणेश भक्तांची कुठल्याच प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून आणि वाहतूक कोंडी व अपघाताच्या घटना होऊ नये याकरिता या वाहतूक शाखेकडून हे नियोजन करण्यात आले आहे. तसेच नाशिक शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेले बी. डी. भालेराव मैदानावर होणारी गणेश भक्तांची गर्दी पाहता या परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
येत्या शुक्रवारी गणेशोत्सवाचा सातवा दिवस पार पडत आहे. त्यामुळे सार्वजनिक व खाजगी गणरायांची विसर्जन केले जाते. यानिमित्ताने छोटेखानी पद्धतीने शहरात विसर्जन मिरवणूक काढल्या जातात. त्यामुळे शुक्रवारीही वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. यानिमित्ताने होणारी गर्दी लक्षात घेता शुक्रवारी पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅन्ड, रविवार कारंजा, अशोक स्तंभ या भागात गर्दी उचलून वाहतूक कोंडी होऊ शकते. यामुळे निमानी बस स्थानकाकडून सुटणाऱ्या सिटी लिंक बसेस, पंचवटी आगारातून सुटणाऱ्या महामंडळाच्या बसेस, जड मोटार वाहनांना दुपारी 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत वरील मार्गावर प्रवेश बंद राहणार आहे.
सीबीएसकडून पंचवटीकडे जाणाऱ्या सर्व बसेस व अन्य जड वाहनांना अशोक स्तंभापासून पुढे रविवार कारंजा व पंचवटी कारंजा जाता येणार नसल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच विसर्जनाच्या दिवशी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
गोल्ड क्लब मैदान, डोंगरे वस्ती गृह मैदान, गौरी पटांगण, म्हसोबा पटांगण साधू ग्राम मैदान, नीलंबरी बाग मैदान, संभाजी स्टेडियम, पवन नगर मैदान, मराठा हायस्कूल पटांगण, शरदचंद्रजी पवार, कवडे गार्डन या ठिकाणी नागरिकांना वाहन लावण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.