पोलिसांना घातली होती अट
भूपतीने शरणागती पत्करण्यापूर्वी एक अट घातली होती. तो आत्मसमर्पण फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समोरच करेल. त्यानुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून आज गडचिरोलीत उपस्थित राहून पोलिसांनी दिलेला शब्द पाळला. या कृतीने सरकारचा संवाद आणि वचनबद्धतेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून भूपती आणि त्याच्या सहकाऱ्यांशी मध्यस्थांच्या माध्यमातून चर्चा सुरू होती. भूपतीने तेलंगणा किंवा छत्तीसगडमध्ये शरणागती पत्करण्याची शक्यता वर्तवली जात असतानाही शेवटी त्याने महाराष्ट्रावर विश्वास दाखवला. पोलिसांनी आणि मध्यस्थांनी त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात परतण्याचे फायदे समजावून सांगितले आणि अखेर आज तो आणि त्याचे सहकारी शस्त्रे खाली ठेवून शांतीचा मार्ग स्वीकारला.
advertisement
..तर आम्ही जंगलातही गेलो असतो
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रसंगी सांगितले की, “भूपतीने आमच्यासमोर शरण येण्याची अट घातली होती. त्याने जंगलात बोलावले असते तरी आम्ही गेलो असतो. कारण हा माओवादी हिंसाचार संपवण्याच्या दिशेने एक निर्णायक टप्पा आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, शासन संवादाच्या मार्गाने या समस्येचे निराकरण करण्यास कटिबद्ध आहे. या आत्मसमर्पणानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली पोलिसांना त्यांच्या धाडसी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांबद्दल १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
दरम्यान, भूपती हा माओवादी संघटनेतील सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी एक मानला जातो. त्याच्याविरुद्ध अनेक राज्यांत गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला मोठा धक्का बसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. या घटनेनंतर अनेक इतर नक्षलवादी देखील शरणागती पत्करण्याचा विचार करत असल्याचे संकेत मिळत आहेत.