गोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने दुसरी यादीही जारी केलीय. पहिल्या यादीनंतर दुसऱ्या यादीतही विद्यमान आमदाराला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने तिकीट नाकारलं. यामुळे आमदाराने पक्षाला रामराम करत संभाजीराजे छत्रपती यांच्या तिसऱ्या आघाडीत प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांना यामुळे धक्का बसला आहे. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी विधानसभेचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे व त्यांचे पुत्र सुगत चंद्रिकापुरे यांनी प्रहार पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे मोरगाव अर्जुनी विधानसभेत तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
मोरगाव अर्जुनी विधानसभेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना तिकीट मिळणे अपेक्षित होते. मात्र, ऐनवेळी भाजपमधून राष्ट्रवादी अजित पवार गटात आलेले माजी मंत्री राजकुमार बडोले यांना अजित पवारांनी पक्षप्रवेश देत उमेदवारी ही जाहीर केली गेली. त्यामुळे नाराज असलेले मनोहर चंद्रिकापुरे व त्यांचे पुत्र सूगत चंद्रिकापुरे यांनी सुरुवातीला शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संपर्क केला.
चंद्रिकापुरे यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याशी देखील त्यांनी संपर्क केला. मात्र तिथेही त्यांची डाळ शिजली नाही. शेवटी त्यांनी आता बच्चू कडू यांच्या तिसऱ्या आघाडीमध्ये (प्रहार) प्रवेश केला आहे. यामुळे आमदार चंद्रिकापुरे यांनी म्हटलं की,त्या पक्षामध्ये मी निष्ठावंत म्हणून काम केलं आहे. 2024 ची निवडणूक आल्यानंतर सुद्धा मी मतदार संघातून माघार घेतली नाही. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर माझी तिकीट कापली गेली आहे. परंतु आता या निवडणुकीत मी माझ्या सामान्य कार्यकर्त्यां सोबत ही निवडणूक लढणार असून राष्ट्रवादी पक्षाला आम्ही नक्कीच धडा शिकवणार असे यावेळी आमदार मनोहर चंदिकापुरे म्हणाले.
